Corona Vaccine : कोरोना लशीवरुन राहुल गांधींनी मोदींना विचारले 'हे' चार प्रश्न!
By मोरेश्वर येरम | Published: November 23, 2020 06:00 PM2020-11-23T18:00:57+5:302020-11-23T18:06:21+5:30
कोरोना लस भारतीयांना उपलब्ध करुन देण्यापूर्वी पंतप्रधानांनी या चार प्रश्नांची उत्तरं द्यावीत असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे.
नवी दिल्ली
देशात कोरोनाचे आकडे पुन्हा एकदा वाढू लागले आहेत. राजस्थान, गुजरात आणि दिल्लीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने पुन्हा एकदा निर्बंध लादण्याची वेळ आली आहे. तर दुसरीकडे कोरोनावर मात करणाऱ्या लशीची सर्वजण आतुरतेने वाट पाहात आहेत.
गेल्या काही दिवसांपासून कोरोना लशीबाबत नवेनवी माहिती समोर येत आहे. पण याच लशीच्या मुद्द्यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लशी संदर्भात चार प्रश्न विचारले आहेत. कोरोना लस भारतीयांना उपलब्ध करुन देण्यापूर्वी पंतप्रधानांनी या चार प्रश्नांची उत्तरं द्यावीत असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे.
राहुल गांधी यांनी विचारलेले प्रश्न...
१. उपलब्ध होणाऱ्या करोना लशींमधून भारत सरकार कोणत्या लशीची निवड करणार? आणि का?
२. सर्वात प्रथम कोरोनाची लस कुणासाठी उपलब्ध करुन दिली जाईल? आणि त्याच्या वितरणाची सरकारची योजना काय?
३. लस मोफत उपलब्ध होईल यासाठी पीएम केअर फंडाचा वापर केला जाणार का?
४. भारतीयांना केव्हापर्यंत लस दिली जाणार?
The PM must tell the nation:
— Rahul Gandhi (@RahulGandhi) November 23, 2020
1. Of all the Covid vaccine candidates, which will GOI choose & why?
2. Who will get the vaccine first & what will be the distribution strategy?
3. Will PMCares fund be used to ensure free vaccination?
4. By when will all Indians be vaccinated?
कोरोनावरील लस अंतिम टप्प्यात असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही दिली होती. त्यानंतर कोवॅक्सीन आणि कोविशील्ड या लशी पुढील वर्षाच्या सुरुवातीला उपलब्ध होण्याची शक्यता असल्याचंही वृत्त समोर आलं आहे. यासर्व पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी हे चार सवाल उपस्थित करुन मोदींवर निशाणा साधला आहे.
देशात सध्या कोरोना रुग्णांच्या एकूण संख्येने ९१ लाखांचा टप्पा पार केला आहे. गेल्या २४ तासांत देशात ४४,०५९ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर ५११ जणांचा मृत्यू झाला आहे. हे वाढते आकडे भारताची चिंता वाढवणारे ठरत आहेत. कोरोना रुग्णांच्या संख्येत भारत सध्या दुसऱ्या स्थानावर आहे. तर अमेरिका प्रथम क्रमांकावर आहे. पण रुग्णांच्या संख्येची हीच गती कायम राहिल्यास भारत प्रथम क्रमांकावर पोहोचेल अशी भिती व्यक्त करण्यात येत आहे.
कोरोनामुळे भारतात आतापर्यंत ३३ हजार ७३८ जणांना आपल्या प्राणांना मुकावे लागले आहे. तर आतापर्यंत एकूण ८५ लाख ६२ हजार जणांना कोरोनावर मात केली आहे. गेल्या २४ तासांत ४१,०२४ रुग्ण ठणठणीत होऊन घरी परतले आहेत.