मी नरेंद्र मोदी, मी तुमचा डेटा अमेरिकी कंपन्यांना देतोय, राहुल गांधींंकडून NaMoApp वर प्रश्नचिन्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2018 12:46 PM2018-03-25T12:46:38+5:302018-03-25T13:09:08+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नमो अॅपवरून सध्या काँग्रेस आणि भाजपामध्ये रणकंदन माजले आहे. पंतप्रधान मोदींनी देशवासीयांशी संपर्कात राहण्यासाठी नमो अॅप आणले होते. मात्र काँग्रेसने या अॅपच्या माध्यमातून भारतीयांची खासगी माहिती लीक होत असल्याचा आरोप केला आहे.
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नमो अॅपवरून सध्या काँग्रेस आणि भाजपामध्ये रणकंदन माजले आहे. पंतप्रधान मोदींनी देशवासीयांशी संपर्कात राहण्यासाठी नमो अॅप आणले होते. मात्र काँग्रेसने या अॅपच्या माध्यमातून भारतीयांची खासगी माहिती लीक होत असल्याचा आरोप केला आहे. काँग्रेसकडून सोशल मीडियावर #DeleteNaMoApp अभियानही चालवण्यात येतेय. आतातर खुद्द काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी या वादात उडी घेतली असून, ट्विटरवर एक पोस्ट टाकून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. मी नरेंद्र मोदी, मी तुमचा सगळा डेटा अमेरिकी कंपन्यांमधील माझ्या मित्रांना पुरवत आहे, अशी खोचक टिप्पणी या ट्विटमध्ये करण्यात आली आहे.
रविवारी सकाळी राहुल गांधी यांनी ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या नमो अॅपला टीकेचे लक्ष्य केले. या ट्विटमध्ये राहुल गांधी लिहितात, "हाय, माझं नाव नरेंद्र मोदी आहे. मी भारताचा पंतप्रधान आहे. जेव्हा तुम्ही माझ्या अधिकृत अॅपमध्ये साइन इन करता तेव्हा मी तुमची सगळी माहिती अमेरिकी कंपन्यांना माझ्या मित्रांना देतो." नमो अॅपचा वापर करणाऱ्या व्यक्तींची खासगी माहिती त्यांची कुठलीही परवानगी न घेता अमेरिकन कंपन्यांना पुरवली जात असल्याचा आरोप होत आहे.
Hi! My name is Narendra Modi. I am India's Prime Minister. When you sign up for my official App, I give all your data to my friends in American companies.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) March 25, 2018
Ps. Thanks mainstream media, you're doing a great job of burying this critical story, as always.https://t.co/IZYzkuH1ZH
नमो अॅपवरून काँग्रेसने मोदी आणि भाजपाला चौफेर घेरले आहे. नरेंद्र मोदी अॅपवर खाते उघडणाऱ्यांची खासगी माहिती क्लेव्हर टॅप नामक अमेरिकन कंपनीला पाठवली जात असल्याचा आरोप एका ट्विट्च्या माध्यमातून केला जात आहे. नमो अॅप अँड्रॉइट प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असून, गुगल प्ले स्टोअर्सवर असलेल्या माहितीनुसार हे अॅप सुमारे 50 लाख हून अधिक लोकांनी डाऊनलोड केले आहे. दुसरीकडे भाजपाने मात्र हे आरोप फेटाळून लावले आहे. भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी काँग्रेस केवळ मोदींनाच नव्हे तर मोदी अॅपलापण घाबरली असल्याचा टोला लगावला आहे.