'आम्हाला गरज नाही, अशा नेत्यांनी आमच्या काँग्रेसमधून निघून जावं', राहुल गांधींचा रोख कुणाकडे?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2024 07:19 PM2024-02-02T19:19:03+5:302024-02-02T19:21:35+5:30
राहुल गांधींच्या नेतृत्वातील भारत जोडो न्याय यात्रा सध्या पश्चिम बंगालमध्ये आहे.
Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra: काँग्रेस नते राहुल गांधी सध्या भारत जोडो न्याय यात्रेसह पश्चिम बंगालमध्ये आहेत. यावेळी त्यांनी पक्ष सोडणाऱ्या नेत्यांवर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आणि मिलिंद देवरा यांची नावे घेऊन पक्ष सोडणाऱ्या नेत्यांवर निशाणा साधला. अशा लोकांची आम्हाला गरज नाही, असंही राहुल यावेळी म्हणाले.
राज्यातील 'डिजिटल मीडिया'शी बोलताना राहुल गांधी यांना काँग्रेस पक्ष कमजोर झालाय का? यासोबतच पूर्वी काँग्रेसमध्ये असणारे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर राहुल गांधी म्हणाले की, 'मला हिमंत बिस्वा सरमा आणि मिलिंद देवरासारख्या लोकांची गरज नाही. अशा लोकांनी आमच्यापासून दूर जावे. हिमंता एका विशिष्ट प्रकारच्या राजकारणाचे प्रतिनिधित्व करतात, जे काँग्रेसचे राजकारण नाही. हिमंता यांनी मुस्लिमांबद्दल दिलेली काही विधाने तुम्ही पाहिली आहेत का? आमची काही मूल्ये आहेत, आम्ही त्यांचे रक्षण करू, असं राहुल यावेळी म्हणाले.
मैं मुश्किल सवालों से नहीं डरता, फिर वो INDIA गठबंधन पर हो, कांग्रेस छोड़ गए नेताओं पर हो या #PaanchNYAY पर।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 2, 2024
पश्चिम बंगाल में डिजिटल मीडिया योद्धाओं के साथ एक लंबी और सार्थक चर्चा हुई।
ईमानदारी से खुलकर सवालों का जवाब देना अच्छा लगता है, सत्ता में बैठे लोग भी कोशिश कर सकते हैं। pic.twitter.com/ZFxHvPDP1q
ममता बॅनर्जींवर राहुल काय म्हणाले?
पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसच्या जागावाटपातील अडथळ्यांवर राहुल गांधी म्हणाले, आमची इंडिया आघाडी आहे. ममता बॅनर्जी किंवा आम्ही इंडिया आघाडी तोडलेली नाही. ममताजी आघाडीत असल्याचे सांगत आहेत. आम्हीदेखील आघाडीतच आहोत. दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपावर चर्चा सुरू आहे, यावर लवकरच तोडगा निघेल.
राहुल गांधी असं का म्हणाले?
हिमंता बिस्वा सरमा यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. तसेच भारत जोडो यात्रा आसाममध्ये असताना राहुल गांधी आणि हिमंता बिस्वा सरमा यांच्यात जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली. हिमंता यांनी राहुल गांधींवर आसाममध्ये अशांतता भडकवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला, तर राहुल यांनी हिमंता यांना भारतातील 'सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री' म्हटले.
तसेच, मिलिंद देवरा महाराष्ट्रातील एक दिग्गज काँग्रेस नेते होते, ज्यांनी महाराष्ट्रात जागावाटपावरुन मतभेद झाल्यानंतर काही दिवसांपूर्वीच पक्ष सोडून आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. मिलिंद देवरा यांना मुंबई दक्षिणमधून निवडणूक लढवायची होती, पण विद्यमान खासदार तिथूनच असल्याने ही जागा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे जाणार आहे.