"तेलंगणात मिळालेलं यश राहुल गांधीच्या 'भारत जोडो' यात्रेमुळेच; आम्ही ७०हून जास्त जागा जिंकू"
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2023 09:57 AM2023-12-03T09:57:17+5:302023-12-03T09:58:34+5:30
Telangana Assembly Election Result 2023: काँग्रेसचे तेलंगणा निरीक्षक माणिकराव ठाकरेंचा मोठा दावा
Telangana Vidhan Sabha Election Result 2023: तेलंगणातील मतमोजणी सुरू होताच, या राज्यासाठी काँग्रेसचे निरीक्षक माणिकराव ठाकरे यांनी मोठा दावा केला आहे. तेलंगणामध्येकाँग्रेस ७०हून अधिक जागा जिंकेल. एक्झिट पोलनेही तेच सांगितले आहे. तेलंगणात काँग्रेसला अनुकूल वातावरण दिसून आले आहे, याचे श्रेय राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला जाते. त्यांच्या या यात्रेचे फलित म्हणून आम्ही नक्कीच ११९ पैकी ७० पेक्षा जास्त जागा जिंकू असा विश्वास माणिकराव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.
मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा निवडणूक निकालांच्या LIVE UPDATES साठी क्लिक करा!
माणिकराव ठाकरे एएनआयला म्हणाले, "आमच्या पक्षप्रमुख प्रियांका गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांनी लोकांना आमच्या धोरणांबद्दल नीट समजावून सांगितले. राहुल गांधींच्या भारत जोडो दौऱ्याचा चांगला परिणाम झाला. केसीआर तेलंगणात एखाद्या बादशाह किंवा सम्राटासारखे वागले. काँग्रेसने तेलंगणाला राज्याचा दर्जा दिला होता. राज्यातील प्रत्येकाची तीच इच्छा होती आणि ती इच्छा काँग्रेसने पूर्ण केली. तेलंगणाला वेगळ्या राज्याच्या दर्जा दिल्यावर तेथील लोकांची आणि राज्यातील प्रगती होईल असे वाटले होते. पण तसे झाले नाही. याउलट राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे राज्यातील लोकांना आशेचा किरण दिसला," अशा शब्दांत त्यांनी राहुल यांच्या यात्रेबाबत विश्वास व्यक्त केला.
त्यांनी सीएम केसीआर यांच्यावर टीका केली. काँग्रेसने सर्वसामान्य जनतेत जाऊन काम केले आणि म्हणूनच लोकांचे लक्ष काँग्रेसकडे वळले. "केसीआर यांनी जाहिरातींवर अमाप पैसा खर्च केला. त्यांनी त्यांच्या फार्महाऊसमधून सरकार चालवले. कोणालाही रोजगार दिला नाही. पण आम्ही सर्वांशी बसून आणि बोलून पक्षाला पुढे नेले. सर्व काम विचारपूर्वक केले. चांगले वातावरण निर्माण झाले आणि लोकांनी काँग्रेसवर विश्वास व्यक्त केला. त्यामुळे आता तेलंगणात आम्ही विजयी होऊ", असे माणिकराव ठाकरे म्हणाले.
दरम्यान, तेलंगणातील विधानसभेच्या १९९ जागांसाठी आज सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. मतमोजणीच्या प्रक्रियेत राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांसह 109 पक्षांच्या 2,290 उमेदवारांचे भवितव्य उघड होईल. त्यानंतर दुपारपर्यंत निकालाचे स्पष्ट चित्र समोर येण्याची शक्यता आहे.
२०१८ मध्ये, भारत राष्ट्र समिती (BRS) म्हणजेच तेव्हाची तेलंगणा राष्ट्र समिती (TRS) ने 119 पैकी 88 जागा जिंकल्या होत्या. तेव्हा त्यांना ४७ टक्के मते होती. तर काँग्रेस १९ जागांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.