"काँग्रेसची न्याय यात्राही दिशाभूल करण्यासाठीच; गांधी घराण्याने नेहमीच जनतेवर अन्याय केला"
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2023 03:06 PM2023-12-27T15:06:31+5:302023-12-27T15:07:10+5:30
केशव प्रसाद मौर्य यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून राहुल गांधी आणि काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत.
उत्तर प्रदेश सरकारचे उपमुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते केशव प्रसाद मौर्य यांनी काँग्रेसच्या भारत न्याय यात्रेवर प्रतिक्रिया दिली आहे. केशव प्रसाद मौर्य यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून राहुल गांधी आणि काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. "काँग्रेसची न्याय यात्राही जनतेची दिशाभूल करण्यासाठीच आहे, गांधी घराण्याने नेहमीच जनतेवर अन्याय केला" असं म्हणत हल्लाबोल केला आहे.
"पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गॅरेंटीच्या गाडीसमोर राहुल गांधींच्या प्रेमाच्या खोट्या दुकानावर ना माझा विश्वास होता ना त्यांच्या तथाकथित भारत जोडो यात्रेवर! काँग्रेसची न्याय यात्राही जनतेची दिशाभूल करण्यासाठीच आहे, गांधी घराण्याने नेहमीच जनतेवर अन्याय केला" असं केशव प्रसाद मौर्य यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. काँग्रेसने बुधवारी पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली 14 जानेवारी ते 20 मार्च या कालावधीत ‘भारत न्याय यात्रा’ आयोजित करण्याची घोषणा केली.
यशस्वी प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी की गारंटी की गाड़ी के सामने श्री राहुल गांधी की मोहब्बत की फ़र्ज़ी दुकान पर यक़ीन रहा और न ही उनकी कथित भारत जोड़ो यात्रा पर ! कांग्रेस की न्याय यात्रा भी जनता को गुमराह करने के लिए है,दबी-कुचली जनता के साथ गांधी परिवार ने सदा अन्याय किया!
— Keshav Prasad Maurya (@kpmaurya1) December 27, 2023
भारत न्याय यात्रेचा हा प्रवास मणिपूरपासून सुरू होऊन मुंबईपर्यंत जाईल आणि यादरम्यान 14 राज्ये आणि 85 जिल्ह्यांमध्ये सहा हजार किलोमीटरहून अधिक अंतर पार केलं जाईल. ‘भारत न्याय यात्रा’ मणिपूर, नागालँड, आसाम, मेघालय, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरातमधून जाईल आणि 6,200 किलोमीटरचे अंतर पार करेल.
काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. ते म्हणाले, 'भारत जोडो यात्रेनंतर काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली 'भारत न्याय यात्रा' काढणार आहे. पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे 14 जानेवारीला इम्फाळ येथून यात्रेला हिरवा झेंडा दाखवतील. रमेश म्हणाले की, ‘भारत न्याय यात्रे’मध्ये देशातील लोकांसाठी आर्थिक, सामाजिक आणि राजकीय न्याय यावर भर दिला जाईल.
के.सी. वेणुगोपाल यांनी बुधवारी सांगितले, "अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने (AICC) 14 जानेवारी ते 20 मार्च दरम्यान मणिपूर ते मुंबई अशी 'भारत न्याय यात्रा' आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे." या प्रवासात देशातील महिला, तरुण आणि समाजातील लोकांशी चर्चा केली जाणार आहे. 'भारत न्याय यात्रा' बहुतांशी बसने निघणार आहे, परंतु काही ठिकाणी पायी पदयात्राही होणार आहे.