चक्रव्यूह भाषण आवडले नाही, माझ्यावर ED छाप्याची तयारी, चहा-बिस्किटांनी स्वागत: राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2024 05:56 AM2024-08-03T05:56:20+5:302024-08-03T05:56:44+5:30
‘टू इन वन’ला माझे चक्रव्यूह भाषण आवडले नाही. छापेमारीची तयारी सुरू असल्याचे ईडीच्या अंतर्गत सूत्रांनी मला सांगितले, असे राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर म्हटले.
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : सभागृहात ‘चक्रव्यूह’ भाषणानंतर अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आपल्याविरोधात छापे टाकण्याची तयारी करीत आहे. त्यांचे खुल्या मनाने स्वागत करण्यासाठी आपण ईडीच्या लोकांची वाट पाहत आहोत आणि आपल्या वतीने त्यांना चहा आणि बिस्किटे देऊ, असा दावा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी केला.
स्पष्टच आहे की, ‘टू इन वन’ला माझे चक्रव्यूह भाषण आवडले नाही. छापेमारीची तयारी सुरू असल्याचे ईडीच्या अंतर्गत सूत्रांनी मला सांगितले. मी मनापासून ईडीची वाट पाहत आहे. माझ्याकडून चहा आणि बिस्किटे, असे राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर ट्विट केले.
काँग्रेस खासदार मणिकम टागोर यांनी लोकसभेत स्थगन प्रस्तावाची सूचना दिली. केंद्र सरकारकडून राजकीय दडपशाहीसाठी ईडी, सीबीआय आणि आयकर विभाग यासारख्या यंत्रणांचा गैरवापर यावर चर्चेची मागणी त्याद्वारे त्यांनी केली.
काय म्हणाले होते राहुल गांधी?
सोमवार, २९ जुलै रोजी लोकसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेत भाषण करताना राहुल यांनी अर्थसंकल्पाची तुलना महाभारतातील चक्रव्यूहाशी केली होती. ते म्हणाले - सहा जणांची टोळी संपूर्ण देशाला चक्रव्यूहात अडकवत आहे. राहुल यांनी पंतप्रधान, गृहमंत्री यांच्यासह दोन बड्या उद्योगपतींचीही नावे घेतली. मात्र, अध्यक्षांनी आक्षेप घेताच त्यांनी ती नावे सांकेतिक रुपात घेतली. ‘इंडिया’ आघाडी चक्रव्यूह मोडून काढेल, असेही राहुल म्हणाले होते.
हजारो वर्षांपूर्वी अभिमन्यूला चक्रव्यूहात अडकवून ६ जणांनी मारले होते. चक्रव्यूहाचे दुसरे नाव पद्मव्यूह आहे, जे कमळाच्या फुलाच्या आकाराचे आहे. त्यात भीती आणि हिंसा आहे, असेही ते म्हणाले.