Rahul Gandhi : "मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा द्वेष करत नाही, पण कधी कधी..."; राहुल गांधींचा अमेरिकेत मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2024 10:21 AM2024-09-10T10:21:42+5:302024-09-10T10:31:09+5:30
Rahul Gandhi And Narendra Modi : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. राहुल गांधी अमेरिकेतील एका कार्यक्रमात म्हणाले होते की, "मी याकडे स्वतंत्र निवडणूक म्हणून पाहत नाही. मी याकडे नियंत्रित निवडणूक म्हणून पाहतो. मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा द्वेष करत नाही. पण कधी-कधी मला मोदींबद्दल सहानुभूती वाटते."
"मला वाटत नाही की निष्पक्ष निवडणुकीत भाजपा २४६ च्या जवळपास असेल. आमची बँक खाती बंद करण्यात आली होती. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या त्यांची ताकद मोठी होती. निवडणूक आयोग त्यांना हवं तसं करत होता. निवडणुकीची आखणी अशा पद्धतीने करण्यात आली होती की, नरेंद्र मोदी देशभरात प्रचारासाठी जाऊ शकतील. ज्या राज्यांमध्ये ते कमकुवत होते, तिथलं नियोजन अन्य राज्यांपेक्षा वेगळं होतं. त्यामुळे या निवडणुका निष्पक्षपणे झाल्या असं म्हणता येणार नाही."
"मी संविधान पुढे ठेवू लागलो"
"निवडणुकीपूर्वी आम्ही या विचारावर जोर दिला आहे की, आरएसएसने शिक्षण व्यवस्था काबीज केली आहे. मीडिया आणि तपास यंत्रणांना ताब्यात घेतलं आहे. आम्ही असं म्हणत राहिलो पण लोकांना ते समजू शकलं नाही... मी संविधान पुढे ठेवू लागलो. राज्यघटनेचे रक्षण करणाऱ्यांची आणि ती नष्ट करणाऱ्यांची ही लढाई आहे हे गरीब जनतेला समजलं... जात जनगणनेचा मुद्दाही मोठा झाला... या गोष्टी अचानक एकत्र येऊ लागल्या..." असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
"मी मोदींचा द्वेष करत नाही"
राहुल गांधी वॉशिंग्टनमध्ये म्हणाले की, "मी नरेंद्र मोदींचा द्वेष करत नाही... मी त्यांच्या दृष्टिकोनाशी सहमत नाही पण मी त्यांचा द्वेषही करत नाही, मला त्यांच्याबद्दल अनेकवेळा सहानुभूती वाटते. आम्ही भाजपाच्या विरोधात निवडणूक लढवून जिंकू असा विश्वास आहे. येत्या दोन-तीन महिन्यांत या निवडणुका आम्ही जिंकू."