CAA : 'राहुल गांधी फक्त मूर्ख नाहीत तर महामूर्ख आहेत'
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2019 04:12 PM2019-12-31T16:12:15+5:302019-12-31T16:17:48+5:30
Citizen Amendment Act : 'राहुल गांधी फक्त मूर्ख नाहीत तर महामूर्ख आहेत' असं नायब सिंह सैनी यांनी केला आहे.
नवी दिल्ली - हरयाणामधील कुरुक्षेत्र येथील भाजपा खासदार तसेच माजी मंत्री नायब सिंह सैनी यांनी राहुल गांधींवर टीका करताना एक वादग्रस्त विधान केलं आहे. 'राहुल गांधी फक्त मूर्ख नाहीत तर महामूर्ख आहेत' असं नायब सिंह सैनी यांनी म्हटलं आहे. तसेच नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबद्दलकाँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना काहीही माहिती नसल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.
नायब सिंह सैनी यांनी राहुल गांधी यांचा उल्लेख महामूर्ख असा केला आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्यामुळे कोणत्याही नागरिकाचं नागरिकत्व काढून घेण्यात येणार नाही ही गोष्ट राहुल गांधी यांना माहिती नसल्याचा टोला त्यांनी लगावला आहे. 'राहुल गांधी फक्त मूर्ख नाहीत तर महामूर्ख आहेत. सीएए हे नेमकं काय आहे आणि कशासाठी आहे हेच त्यांना माहीत नाही' असं सैनी यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
काँग्रेस नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबद्दल लोकांमध्ये गैरसमज पसरवत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. तसेच सरकारला घेरण्यासाठी त्यांच्याकडे कोणताच मुद्दा नसल्याने कायद्यासंबंधी लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत असल्याचं देखील म्हटलं आहे. काँग्रेस पक्षाच्या स्थापनादिनी नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीच्या (एनआरसी) विरोधात देशभर विरोध प्रदर्शन करण्यात आले होते. त्यावेळी राहुल गांधी यांनी गुवाहाटीमध्ये आयोजित कार्यक्रमात मोदी सरकार आणि आरएसएसवर हल्लाबोल केला होता.
"आम्ही भाजपा आणि आरएसएसला आसामची भाषा, इतिहास आणि संस्कृतीवर आक्रमण करू देणार नाही. आसामला नागपूर आणि आरएसएसचे चड्डीवाले चालवू शकत नाहीत, तर आसामची जनताच चालविणार आहे", असं सांगत राहुल गांधी यांनी आरएसएसवर निशाणा साधला होता. याचबरोबर, राहुल गांधी यांनी सीएए आणि एनआरसीच्या मुद्द्यांवरून नरेंद्र मोदी सरकारला लक्ष्य केले. आसामच्या जनतेला लढवायचे... भारतातील जनतेला लढवायचे... ज्या ठिकाणी जातील, त्याठिकाणी फक्त द्वेष पसरवत आहेत. मात्र, आसामची जनता द्वेषाने किंवा रागाने पुढे जाणार नाही. तर प्रेमाने पुढे जाणारी आहे, असं राहुल गांधी म्हणाले होते.