मध्य प्रदेश, तेलंगण, छत्तीसगड काँग्रेस जिंकेल, पण राजस्थानात...; राहुल गांधींचे सूचक विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2023 07:10 PM2023-09-24T19:10:02+5:302023-09-24T19:13:28+5:30
Rahul Gandhi News: राजस्थान विधानसभा निवडणुकांबाबत राहुल गांधींच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्याचे सांगितले जात आहे.
Rahul Gandhi News: आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी देशातील काही राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांमध्ये इंडिया आघाडीने भाजपचा पराभव करण्यासाठी रणनीति आखली आहे. काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी मध्य प्रदेश, तेलंगण, छत्तीसगड या राज्यांत काँग्रेसचा विजय होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. मात्र, राजस्थानबाबत सूचक विधान केले आहे. राहुल गांधी यांच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्याचे सांगितले जात आहे.
एका कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी म्हणाले की, जातनिहाय जनगणनेच्या मागणीपासून लोकांना विचलित करण्याचे काम भाजप करत आहे. रमेश बिधुरी यांच्यानंतर निशिकांत दुबे यांचं विधान तुम्ही पाहा. भाजपचे नेते जातनिहाय जनगणनेच्या मागणीपासून विचलित करण्याचा प्रयत्न करत आहेत. जातनिहाय जनगणना ही भारतातील जनतेला हवी असणारी मूलभूत गोष्ट आहे, हे भाजपला माहिती आहे. म्हणून त्यावर भाजपला चर्चा करायची नाही, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. यावेळी विविध राज्यातील विधानसभा निवडणुकांबाबतही भाष्य केले.
मध्य प्रदेश, तेलंगण, छत्तीसगड काँग्रेस जिंकेल
मध्य प्रदेश, तेलंगण, छत्तीसगडमध्ये जिंकण्याचा विश्वास राहुल गांधी यांनी व्यक्त केला आहे. तर, राजस्थानमध्ये अटीतटीची लढाई असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. आम्ही तेलंगण, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये जिंकत आहोत. पण, राजस्थानमध्ये जिंकण्याच्या जवळ आहोत. काँग्रेस ही निवडणूक जिंकेल, असा विश्वास आम्हाला आहे. भाजपच्या अंतर्गत सुद्धा हीच चर्चा आहे, असा दावा राहुल गांधी यांनी केला.
दरम्यान, मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगण आणि मिझोरममध्ये डिसेंबर महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. राजस्थान, छत्तीसगडमध्ये काँग्रेसची, तर मध्य प्रदेशात भाजपचे सरकार आहे. तसेच तेलंगणमध्ये भारत राष्ट्र समितीची सत्ता आहे.