Rahul Gandhi: काँग्रेस नेते राहुल गांधी उद्या सूरतला जाणार; न्यायालयाच्या निर्णयाला देणार आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2023 01:20 PM2023-04-02T13:20:17+5:302023-04-02T13:21:36+5:30
Rahul Gandhi: राहुल गांधी यांना सूरत न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
Rahul Gandhi: मोदी आडनावाबाबत केलेल्या वक्तव्याप्रकरणी दोषी आढळल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी या निर्णयाला न्यायालयात आव्हान देणार आहेत. राहुल गांधी सोमवारी सुरत सत्र न्यायालयात या निकालाला आव्हान देणारी याचिका दाखल करू शकतात. राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने दोषी ठरवले आणि दोन वर्षांच्या शिक्षेसह 15 हजार रुपटे दंड ठोठावला. या निर्णयानंतर लोकसभा सचिवालयाने त्यांचे सदस्यत्व रद्द केले.
2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी कर्नाटकातील कोलार येथे एका सभेत राहुल गांधी यांनी मोदी आडनावाबाबत वादग्रस्त टिप्पणी केली होती. 'सर्व चोरांची नावे मोदीच कशी असतात' असे वक्तव्य त्यांनी केले होते. त्या वक्तव्याविरोधात गुजरातमधील भाजप आमदाराने सुरतमध्ये मानहानीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, राहुल यांना सत्र न्यायालयात अपील करण्यासाठी स्वतः उपस्थित राहायचे आहे. गुजरातसह अन्य बड्या नेत्यांना पोहोचण्यासही सांगितले आहे. उच्च न्यायालयात अपीलसह अन्य पर्यायांवरही निर्णय होऊ शकतो, असे पक्षातील सूत्रांचे म्हणणे आहे.
शिक्षा जाहीर झाल्यानंतर राहुल गांधी यांनी ट्विटरवर पोस्ट केली होती की, 'माझा धर्म सत्य आणि अहिंसेवर आधारित आहे. सत्य माझा देव आहे आणि अहिंसा त्याला मिळवण्याचे साधन आहे.' काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा यांच्यासह पक्षाच्या अनेक नेत्यांनी न्यायालयाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती. याशिवाय, काँग्रेस पक्षाने देशभरात एकदिवसीय संकल्प सत्याग्रह केला होता.