ठरलं ! काँग्रेस अध्यक्षपदासाठी राहुल गांधी 4 डिसेंबरला दाखल करणार अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2017 10:55 AM2017-11-29T10:55:43+5:302017-11-29T12:03:21+5:30
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असलेले काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे पक्षाची कमान सोपवण्यासाठी संपूर्ण तयारी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.
नवी दिल्ली - गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असलेले काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे पक्षाची कमान सोपवण्यासाठी संपूर्ण तयारी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी 4 डिसेंबरला काँग्रेस मुख्यालयात अध्यक्षपदासाठी आपला अर्ज दाखल करणार आहेत. अर्ज दाखल करण्यापूर्वी राहुल गांधी 1 आणि 2 डिसेंबरला केरळमध्ये असतील. दरम्यान, बुधवारी (29 नोव्हेंबर) राहुल गांधी गुजरातच्या दौ-यावर असणार आहेत. येथे सोमनाथ मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर राहुल गांधी आपल्या दोन दिवसीय दौ-याची सुरुवात करतील.
दरम्यान, गेल्या दिवसांपासूनच राहुल गांधी यांच्याकडे पक्षाचे अध्यक्षपद सोपवले जाणार असल्याच्या चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहेत. यापूर्वी अशी माहिती समोर आली होती की, राहुल गांधी यांच्याकडे पक्षाचे अध्यक्षपद सोपवले जाण्याच्या पार्श्वभूमीवर पक्षात मोठ्या स्तरावर बदल होऊ शकतात.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस पक्षात निर्णयाच्या प्रक्रियेत पूर्णतः बदल होऊ शकतात. राहुल गांधी यांच्यासोबत दोन नवीन नेत्यांनाही निर्णय प्रक्रियेत आणलं जाईल. हे नेते राहुल गांधींकडे अध्यक्षपद सोपवलं गेल्यानंतर त्यांना मदत करतील. दरम्यान, काही राज्यांतील समितींनी फार पूर्वीच राहुल गांधी यांना लवकरात लवकर अध्यक्ष बनवण्यासाठीचा प्रस्तावही पारित केला आहे. तर दुसरीकडे 31 डिसेंबरपर्यंत काँग्रेस पक्षातील अध्यक्ष पदाची निवडणूक व्हावी, असं निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले आहे.
काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम गुजरात निवडणुकीच्या पहिल्या फेरीचे मतदान 9 डिसेंबर रोजी होण्याआधी पार पडेल आणि सध्या उपाध्यक्ष असलेले राहुल गांधी औपचारिकपणे पक्षाची धूरा हाती घेतील, असे मानले जात आहे. बरोब्बर एक वर्षापूर्वी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये काँग्रेस कार्यकारिणीने राहुल गांधींनी सूत्रे हाती घ्यावी, अशी एकमुखी विनंती केली होती. त्यानंतर पक्षाच्या निवडणुका झाल्या. पण पक्षाध्यक्षपदाची निवडणूक मात्र लांबणीववर पडत गेली होती. शिवाय स्वत: राहुल गांधींनी नेमणुकीपेक्षा निवडून येण्याचा आग्रह धरला होता.
सन २००४ मध्ये सक्रिय राजकारणात आलेल्या राहुल गांधींना सन २०१३ मध्ये पक्षाचे उपाध्यक्ष केले गेले. त्यानंतर पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या आजारपणामुळे पक्षाचा कारभार लौकिक अर्थाने तेच चालवीत होते. आता गुजरात व हिमाचल प्रदेश निवडणूक प्रचाराची धूराही तेच मोठ्या आक्रमकतेने सांभाळत आहेत.
आणखी वाचा: 35 साल बाद! नाराज वरूण गांधी धरणार राहुलचा 'हात', प्रियंका करणार मध्यस्थी?
सोनियाजी मार्गदर्शक
सन १९८९ पासून काँग्रेस अध्यक्षा असलेल्या सोनिया गांधी या काँग्रेस पक्षाच्या सर्वाधिक दीर्घकाळ पदावर राहिलेल्या पक्षाध्यक्षा आहेत. सोनियाजी पक्षाच्या मार्गदर्शक व काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेतेपदी कायम राहतील, असे संकेत पक्षातून मिळाले.