अमेठीतून निवडणूक लढवणार का? राहुल गांधी म्हणाले, "हायकमांड..."
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 12:04 PM2024-04-17T12:04:02+5:302024-04-17T12:05:38+5:30
Rahul Gandhi On Amethi Lok Sabha Seat : राहुल गांधी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली.
गाझियाबाद : देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. भाजपा नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याविरोधात उत्तर प्रदेशातील अमेठी मतदारसंघातून निवडणूक लढवण्याबाबत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. हायकमांड जो काही निर्णय घेईल, तो मला मान्य असेल, असे राहुल गांधी यांनी बुधवारी सांगितले.
गाझियाबादमध्ये राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी राहुल गांधी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. पंतप्रधान मोदी भ्रष्टाचाराचे चॅम्पियन आहेत, असे राहुल गांधी म्हणाले. निवडणुकीत अनेक मोठे मुद्दे आहेत. त्यात सगळ्यात मोठे बेरोजगारी, महागाई हे मुद्दे आहेत. मोदींकडून या सगळ्यांना बगल देण्याचा प्रयत्न सुरू आहे. जे मुद्दे आहेत त्यावर भाजपा, पंतप्रधान यापैकी कोणीच बोलत नाहीत, असेही राहुल गांधी म्हणाले.
दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीत केरळमधील वायनाड आणि उत्तर प्रदेशातील अमेठीमधून निवडणूक लढवली होती. मात्र अमेठीमधून त्यांचा स्मृती इराणी यांनी पराभव केला होता. तर राहुल गांधी हे वायनाडमधून निवडून आले होते. यंदाच्या निवडणुकीत सुद्धा काँग्रेसने राहुल गांधींना वायनाडमधून उमेदवारी दिली आहे. मात्र अमेठीबाबत अद्याप सस्पेंस कायम आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींच्या पराभवापूर्वी अमेठी ही जागा काँग्रेसचा बालेकिल्ला मानली जात होती. कारण राहुल गांधी यांनी 2004, 2009 आणि 2014 मध्ये या जागेवरून लोकसभा निवडणूक जिंकली होती.
रायबरेली आणि अमेठीतून कोण निवडणूक लढवणार?
इंडिया आघाडीमध्ये उत्तर प्रदेशात 80 जागांपैकी 17 काँग्रेसला जागा देण्यात आल्या आहेत. त्यात रायबरेली आणि अमेठीच्याही जागा आहेत, पण काँग्रेसने दोन्ही जागांवर आपले उमेदवार अद्याप जाहीर केले नाहीत. दुसरीकडे, काँग्रेस प्रियंका गांधी यांना रायबरेलीतून तिकीट देऊ शकते, अशी शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. अमेठीतून राहुल गांधींना उमेदवारी दिली जाऊ शकते, असेही म्हटले जात आहे.