'दुर्दैवी', राहुल गांधींचा ताफा मणिपूर पोलिसांनी अडवला, काँग्रेसने भाजपवर साधला निशाणा...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2023 03:27 PM2023-06-29T15:27:44+5:302023-06-29T15:28:16+5:30
Rahul Gandhi Convoy Stopped: राहुल गांधी मणिपूर दौऱ्यावर गेले, यावेळी सुरक्षेच्या कारणास्तव त्यांचा ताफा पोलिसांनी अडवला.
Rahul Gandhi Manipur Visit: मणिपुरमध्ये गेल्या काही दिवसापासून हिंसाचार सुरू आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आज दोन दिवसीय दौऱ्यासाठी मणिपूरमध्ये दाखल झाले आहेत. यादरम्यान ते पीडित कुटुंबियांची भेट घेणार आहे. पण, पीडित कुटुंबियांना भेटण्यासाठी निघालेल राहुल गांधींचा ताफा मणिपूर पोलिसांनी अडवला आहे. यावरुन काँग्रेसने भाजपवर टीका केली आहे.
हिंसाचारग्रस्त भागात परिस्थिती खराब असल्यामुळे पोलिसांनी राहुल गांधींच्या ताफ्याला रोखले. इम्फाळला पोहोचल्यानंतर राहुल गांधी चुराचंदपूरला रवाना झाले होते, मात्र पोलिसांनी त्यांचा ताफा विष्णुपूरजवळ अडवला. यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसने याला दुर्दैवी म्हटले असून मोदी सरकार राहुल गांधींना रोखत असल्याचा आरोप केला आहे.
काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी ट्विट केले की, "मोदी सरकार राहुल गांधींना मदत शिबिरांना भेट देण्यापासून आणि मणिपूरमधील लोकांशी संवाद साधण्यापासून रोखत आहे, हे अत्यंत दुर्दैवी आहे. राहुल गांधींचा मणिपूर दौरा भारत जोडो यात्रेच्या भावनेशी सुसंगत आहे. पंतप्रधान शांत किंवा निष्क्रिय राहणे निवडू शकतात, परंतु मणिपुरी समाजातील सर्व घटकांचे म्हणणे ऐकून त्यांना दिलासा देण्याचा राहुल गांधींचा प्रयत्न का थांबवताय?'' असा सवालही त्यांनी केला.
मणिपूरला संघर्ष नाही तर शांतता हवी - मल्लिकार्जुन खर्गे
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी राहुल गांधींचा ताफा रोखल्याबद्दल भाजपवर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी ट्विट केले की, "राहुल गांधींच्या ताफ्याला पोलिसांनी विष्णुपूरजवळ रोखले. ते मदत छावण्यांमध्ये पीडितांना भेटण्यासाठी आणि हिंसाचारग्रस्त राज्यात मदत देण्यासाठी तेथे जात होते. पीएम मोदींनी मणिपूरबाबत मौन तोडण्याची तसदी घेतली नाही. त्यांनी राज्याला वाऱ्यावर सोडले. आता त्यांचे विध्वंसक डबल इंजिन सरकार राहुल गांधींना अडवण्याचा प्रयत्न करत आहे. हे पूर्णपणे अस्वीकार्य आहे. मणिपूरला संघर्ष नाही तर शांतता हवी आहे."