युरोपियन शिष्टमंडळाला काश्मीरमध्ये जाण्याची परवानगी दिल्याने राहुल गांधींची सरकारवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2019 10:14 AM2019-10-29T10:14:50+5:302019-10-29T10:19:02+5:30
युरोपियन युनियनचं शिष्टमंडळ आज (मंगळवारी) जम्मू- काश्मीरचा दौरा करणार आहेत.
नवी दिल्ली: युरोपियन युनियनचं शिष्टमंडळ आज (मंगळवारी) जम्मू- काश्मीरचा दौरा करणार आहेत. 5 ऑगस्टला जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 हटवण्यात आलं. त्यानंतर पहिल्यांदाच परदेशी शिष्टमंडळ या भागाला भेट देणार आहेत. मात्र युरोपियनच शिष्टमंडळाला काश्मीरमध्ये जाण्याची परवानगी दिल्याने काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली आहे.
राहूल गांधी ट्विट करत म्हणाले की, जम्मू- काश्मीरमध्ये भारतीय खासदारांना जाण्यापासून रोखण्यात येतं. मात्र परदेशी नेत्यांना काश्मीरमध्ये जाण्याची परवानगी दिल्याने यामध्ये काही तरी चुकीचं असल्याचं सांगत राहुल गांधींनी सरकारवर टीका केली आहे.
जम्मू-काश्मीरमधून कलम 370 काढल्यानंतर जगभरात हा विषय चर्चेत आला. पाकिस्ताननं अनेकदा जागतिक पातळीवरील महत्त्वाच्या परिषदांमध्ये जम्मू काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. मात्र सगळ्याच व्यासपीठांवर पाकिस्तानला अपयश आलं. यानंतर आता युरोपियन युनियनचं शिष्टमंडळ जम्मू काश्मीरला भेट देणार आहे. या शिष्टमंडळात 28 सदस्यांचा समावेश आहे. आतापर्यंत भारतानं कोणत्याही परदेशी शिष्टमंडळाला जम्मू काश्मीरमध्ये जाण्याची परवानगी दिली नव्हती. त्यामुळेच युरोपियन युनियनच्या शिष्टमंडळाचा जम्मू काश्मीर दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे.