राहुल गांधींनी नाव घेतलं नाही, मग भाजपाला का झोंबलं?, नाना पटोलेंचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2023 04:32 PM2023-11-22T16:32:43+5:302023-11-22T16:36:21+5:30
राहुल गांधीनी भरसभेत एका विशिष्ट शब्दाचा वापर केल्याने गदारोळ
Rahul Gandhi Controversial remark Panauti : भारतीय संघाने मायदेशात झालेल्या विश्वचषक स्पर्धेत फायनलमध्ये धडक मारली होती. या स्पर्धेत भारत फायनलपर्यंत अजिंक्य होता. पण फायनलमध्ये ऑस्ट्रेलियन संघाने भारताला त्यांच्याच भूमित पराभूत केले आणि विश्वचषकावर सहाव्यांदा नाव कोरले. या सामन्यासाठी राजकीय आणि मनोरंजन क्षेत्रातील अनेक बडे लोक आले होते. या सामन्याबाबत बोलताना एका ठिकाणी राहुल गांधी यांनी 'पनौती' या शब्दाचा वापर केला. त्यांच्या बोलण्याचा रोख कोणत्या व्यक्तीकडे होता, हे त्यांनी किंवा काँग्रेसमधील कोणत्याही नेत्याने सांगितले नव्हते. परंतु भाजपाने या मुद्द्यावरून राहुल यांच्यावर टीकेची झोड उठवली. या मुद्द्यावरून नाना पटोलेंनीभाजपावर पलटवार केला.
"राहुल गांधी राजस्थानमधील एका प्रचारसभेत बोलत असताना सभेतील गर्दीतूनच पनौती, पनौती असा आवाज येत होता, त्या संदर्भाने राहुल गांधी बोलले, त्यात राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी अथवा कोणत्याही व्यक्तीचे नाव घेतले नाही तरीही भाजपाला ते का झोंबले? त्यातून मोदींचा अपमान कसा होतो? अहमदाबाद स्टेडियमवरील क्रिकेट वर्ल्ड कपच्या फायनल मॅच दरम्यान ‘पनौती’ हा शब्द सोशल मीडियावर ‘ट्रेंड’ झाला होता, आजही तो ‘ट्रेंड’ होत आहे, ती एक जनभावना आहे पण सर्व ठिकाणी मीच आहे असे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो," असे नाना पटोले म्हणाले.
दरम्यान, "भाजपाला आपला पराभव स्पष्ट दिसत असल्यानेच हताश आणि निराश झालेल्या मोदी सरकारने राजकीय सुडबुद्धीने नॅशनल हेराल्डवर ईडीची कारवाई केली आहे. पण काँग्रेस पक्ष मोदी सरकारच्या अशा कारवायांना आम्ही घाबरणार नाही, असेही ते म्हणाले. नॅशनल हेराल्ड प्रकरणाची सर्व कागदपत्रे सार्वजनिक आहेत, यापूर्वीही ती जाहीर केलेली आहेत. पण या प्रकरणात सोनिया गांधी व राहुल गांधी यांना चौकशीच्या नावाखाली बोलावून दहा-दहा तास बसवून नाहक त्रास देण्यास आला होता, त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. जनतेने भाजपचा खोटारडेपणा ओळखला असून त्यांना पराभवापासून वाचता येणार नाही," असा इशारा नाना पटोलेंनी दिला.