फूड डिलिव्हरी पार्टनर्ससोबत राहुल गांधींनी खाल्ला मसाला डोसा, स्कूटरवरून मारला फेरफटका!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2023 11:41 AM2023-05-08T11:41:43+5:302023-05-08T11:43:51+5:30
यावेळी विविध कंपन्यांच्या कंत्राटी कामगार आणि डिलिव्हरी पार्टनर्सच्या समस्या राहुल गांधी यांनी ऐकून घेतल्या.
बंगळुरू : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी रविवारी (7 मे) कर्नाटकची राजधानी बंगळुरुमध्ये कंत्राटी कामगार आणि डिलिव्हरी पार्टनर्स यांच्यासोबक चर्चा केली. यावेळी विविध कंपन्यांच्या कंत्राटी कामगार आणि डिलिव्हरी पार्टनर्सच्या समस्या राहुल गांधी यांनी ऐकून घेतल्या. यासोबतच राहुल गांधींनी या कामगारांसोबत मसाला डोसा आणि कॉफीच्या नाश्ताचाही केला.
राहुल गांधींसोबत चर्चा करताना कामगारांनी तक्रार केली की, बेरोजगारीच्या समस्येमुळे त्यांना कमी पगाराच्या नोकऱ्या घेण्यास भाग पडत आहे. तसेच, राहुल गांधी यांनी कर्मचाऱ्यांशी खेळाविषयी देखील चर्चा केली आणि त्यांना त्यांच्या आवडत्या फुटबॉल खेळाडूंबद्दल विचारले. दरम्यान, यावेळी स्विगी, झोमॅटो, ब्लिंकिट आणि डंझो सारख्या फूड कंपन्यांच्या डिलिव्हरी पार्टनर्ससोबत बंगळुरुमध्ये राहुल गांधी जेवण करताना दिसले. राहुल गांधी यांनी बंगळुरुमधील त्यांच्या हॉटेलमध्ये जाण्यासाठी दुचाकीचा वापर केला.
यासदंर्भात काँग्रेसने ट्वीट केले आहे की, "राहुल गांधी यांनी बंगळुरुमधील प्रतिष्ठित एअरलाईन्स हॉटेलमध्ये कंत्राटी कामगार आणि डंझो, स्विगी, झोमॅटो, ब्लिंकिट इत्यादींच्या फूड डिलिव्हरी करणाऱ्या कंपन्यांच्या पार्टनर्ससह संवाद साधला. मसाला डोसा आणि कॉफीचा नाश्ता करताना त्यांनी फूड डिलिव्हरी पार्टनर्सचे आयुष्य, स्थिर रोजगाराचा अभाव आणि मूलभूत वस्तूंच्या वाढत्या किमती यावर चर्चा केली. या तरुणांनी कंत्राटी नोकऱ्या का स्वीकारल्या आणि त्यांची कामाचं स्वरुप, स्थिती काय आहे, हे देखील राहुल त्यांनी जाणून घेतले."
Shri @RahulGandhi's outreach to gig workers and delivery partners in Bengaluru is a part of his unwavering commitment to the issues of every section of society. pic.twitter.com/uQXB3H8YyD
— Congress (@INCIndia) May 7, 2023
'डबल इंजिन'मध्ये कोणत्या इंजिनला किती कमिशन?
कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी येत्या 10 मे रोजी मतदान होणार असून शनिवारी म्हणजेच 13 मे रोजी निकाल जाहीर होणार आहेत. या निवडणुकीच्या प्रचारात सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोप सुरु आहे. कर्नाटकातील भ्रष्टाचाराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मौनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी रविवारी असा सवाल केला की, डबल इंजिन सरकारच्या प्रत्येक इंजिनला 40 टक्के कमिशनमधून किती मिळाले. राहुल गांधी म्हणाले की, गेल्या तीन वर्षांपासून कर्नाटकात भाजपचे सरकार आहे आणि पंतप्रधानांना इथल्या भ्रष्टाचाराची माहिती आहे. तुम्ही त्याला फक्त 'डबल इंजिन सरकार' म्हणता. यावेळी दुहेरी इंजिन चोरीला गेले आहे.