BJP On Sankalp Satyagraha: 'कोणत्या काँग्रेस नेत्याने देशासाठी इंग्रजांच्या गोळ्या झेलल्या?', भाजप नेत्याचे प्रियंका गांधींना प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2023 04:04 PM2023-03-26T16:04:24+5:302023-03-26T16:05:26+5:30
राहुल गांधी यांच्यावरील कारवाईच्या विरोधात राजधानी दिल्लीतील राजघाटावर काँग्रेसने सत्याग्रह केला.
Rahul Gandhi Disqualified: राजधानी दिल्लीतील राजघाटावर सुरू असलेल्या काँग्रेसच्या संकल्प सत्याग्रहावर भाजप नेते टीका करत आहेत. भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी म्हणाले की, 'सत्याग्रहाच्या नावाखाली महात्मा गांधींच्या समाधीवर जे लोक लोकशाहीचा अपमान करत आहेत, त्यात सत्य नाही तर अहंकार स्पष्टपणे दिसत आहे.'
कोणत्या काँग्रेस नेत्याने रक्त वाहिलं?
काँग्रेसचे भाजपवरील आरोप निराधार असल्याचे सांगत सुधांशू त्रिवेदी म्हणाले की, 'राहुल गांधींवर जी कारवाई झाली, ती न्यायालयीन प्रक्रियेचा भाग आहे. संसदेचा जुना नियम होता, ज्या अंतर्गत सदस्यत्व जाते. हे लोक न्यायालयाचा अपमान करत आहेत. माझ्या कुटुंबाने देशासाठी रक्त सांडले, या प्रियंका गांधींच्या वक्तव्यावर सुधांशू त्रिवेदी म्हणाले, आपल्याला इतिहासात शिकवले गेले की, गांधीजींनी अहिंसेच्या मार्गाने रक्त न सांडता देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले, मग प्रियंका गांधींनी सांगावे की, कोणत्या काँग्रेस नेत्याने रक्त सांडले? स्वातंत्र्यासाठी रक्त सांडणाऱ्या, काळ्या पाण्याची शिक्षा झालेल्या किंवा इंग्रजांच्या गोळ्या झेलणाऱ्या एकाही काँग्रेस नेत्याचे नाव सांगावे,' असे आव्हानच त्यांनी दिले.
गांधीजींचा अपमान केला
त्रिवेदी यांनी यावेळी काँग्रेसच्या सत्याग्रहाला गांधीजींचा अपमान असल्याचे म्हटले. गांधीजींनी त्यांचा पहिला सत्याग्रह एका सामाजिक कारणासाठी केला होता, इथे हे सगळे वैयक्तिक कारणासाठी न्यायालयाविरुद्ध सत्याग्रह करत आहेत. जे काही आरोप केले जात आहेत, ते निराधार आहेत. ते सरकारवर आणि पंतप्रधान मोदींवर टीका करतात. देशातील मागासलेल्या समाजाविरुद्ध द्वेष पसरवता आणि त्यासाठी शिक्षा झाल्यावर व्हिक्टम कार्ड खेळण्याचा प्रयत्न करतात. यात अहंकार आणि निर्लज्जपणा दिसतो. तुमच्या आजी इंदिरा गांधी यांना न्यायालयाने दोषी ठरवले होते. बोफोर्स घोटाळ्यात राजीव गांधींचे नाव पुढे आले होते. तुम्ही कोणत्या पार्श्वभूमीबद्दल बोलत आहात?' अशी टीकाही त्यांनी केली.