"गोडसे के वंशज..."; राहुल गांधींच्या ED चौकशीदरम्यान काँग्रेसची भाजपावर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 05:09 PM2022-06-13T17:09:29+5:302022-06-13T17:10:25+5:30
राहुल गांधींची नॅशनल हेराल्ड प्रकरणी इडी चौकशी
Rahul Gandhi ED Enquiry National Herald: काँग्रेस नेते राहुल गांधी नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी आज सकाळी ईडीच्या (ED) कार्यालयात पहिल्या टप्प्याच्या चौकशीसाठी हजर झाले. यावेळी राहुल यांची सुरूवातीला तीन तास चौकशी झाली. राहुल गांधी यांना लंच टाईमला बाहेर सोडण्यात आले होते. या काळात राहुल यांनी हॉस्पिटलमध्ये असलेल्या सोनिया गांधी यांची भेट घेतली आणि त्यानंतर पुन्हा ते ईडीच्या कार्यालयात दाखल झाले. त्यानंतर त्यांची पुन्हा चौकशी करण्यात आली. या दरम्यान ही कारवाई सुडबुद्धीने केली जात असल्याचा आरोप काँग्रेस समर्थकांकडून करण्यात आला. तशातच काँग्रेसचे प्रवक्ते आणि नवनिर्वाचित खासदार रणदीप सुरजेवाला यांनी भाजपा आणि केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं
काँग्रेसचे वरच्या फळीतील नेते राहुल गांधी यांना ED कार्यालयात चौकशीला बोलावल्यामुळे देशभरातून ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले. आंदोलने करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्ते आणि नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या दरम्यान, रणदीप सुरजेवाला यांनी ट्वीट करत भाजपा आणि केंद्र सरकार यांचा 'गोडसे के वंशज' असा उल्लेख केला. (नथुराम) गोडसेचे वंशज गांधींना तेव्हाही वाकवू शकले नव्हते, आणि आताही झुकवू शकणार नाहीत, अशी टीका त्यांनी केली. तसेच त्यांनी आणखी एक ट्वीटदेखील केले. "भ्याड मोदी सरकारने मध्य दिल्लीचे छावणीत रूपांतर केले आहे. शेकडो पोलीस आणि हजारो पोलीस हवालदार तैनात करून सरकार काय सिद्ध करत आहेत? काँग्रेसच्या हजारो कार्यकर्त्यांना अटक का केली जात आहे? रस्त्यावर उतरणे व आंदोलन करणे गुन्हा आहे का? काहीही असेल तरी सत्याची चळवळ सुरूच राहील", असेही ट्वीट त्यांनी केले.
गोडसे के वंशज गाँधी को न तब झुका पाए थे,
— Randeep Singh Surjewala (@rssurjewala) June 13, 2022
न अब झुका पाएँगे।#IndiaWithRahulGandhipic.twitter.com/p0NAq2BBOK
--
कायर मोदी सरकार ने केन्द्रीय दिल्ली को छावनी में तबदील कर दिया है।
— Randeep Singh Surjewala (@rssurjewala) June 13, 2022
सैंकड़ों पुलिस बैरीयर और हज़ारों पुलिस के सिपाहियों को लगा क्या साबित कर रहे हैं?
हज़ारों कांग्रेस कार्यकर्ताओं की गिरफ़्तारी क्यों?
क्या पैदल चलना भी अपराध है?
सत्य का आंदोलन चलता रहेगा#IndiaWithRahulGandhipic.twitter.com/n7YawhIBuq
दरम्यान, राहुल गांधी यांची चौकशी सुरू असताना ते मधल्या कालावधीत गंगाराम हॉस्पिटलमध्ये सोनिया गांधी यांना भेटण्यासाठी गेले होते. पहिल्या तीन तासांच्या चौकशीनंतर ते सोनिया गांधी यांना भेटण्यासाठी गेले होते. कोरोनाची लागण झाल्याने नंतरच्या उपचारासाठी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून आणखी काही दिवस त्यांना डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे.