राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2024 03:59 PM2024-05-03T15:59:33+5:302024-05-03T16:01:55+5:30
Raebareli Lok Sabha Election 2024: काँग्रेसने रायबरेलीतून राहुल गांधी आणि अमेठीतून किशोरीलाल शर्मा यांना उमेदवारी जाहीर केली.
Rahul Gandhi : रायबरेली : राहुल गांधी यांनी शुक्रवारी रायबरेली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी सोनिया गांधी, प्रियंका गांधी आणि अशोक गेहलोत उपस्थित होते. शुक्रवारी सकाळीच काँग्रेसने अमेठी आणि रायबरेली मतदारसंघातील उमेदवारांची नावे जाहीर केली. त्यानंतर राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियंका गांधी वड्रा, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि इतरांसह रायबरेलीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पोहोचले होते.
लोकसभा निवडणुकीतील उमेदवारी अर्जाच्या शेवटच्या क्षणी काँग्रेसने आपले पत्ते उघड केले. काँग्रेसने रायबरेलीतून राहुल गांधी आणि अमेठीतून किशोरीलाल शर्मा यांना उमेदवारी जाहीर केली. रायबरेली आणि अमेठीच्या जागांसाठी २० मे रोजी मतदान होणार आहे. ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. या जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची आज शेवटची तारीख आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी आज रायबरेली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळाली.
दुसरीकडे, अमेठीतील काँग्रेस उमेदवार किशोरीलाल शर्मा यांनी प्रियंका गांधी यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान, याआधी प्रियांका गांधी अमेठीतून निवडणूक लढवतील, अशी चर्चा होती. मात्र यादी जाहीर झाल्यानंतर सर्व चर्चेला पूर्णविराम मिळाला. किशोरीलाल शर्मा यांचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर प्रियंका गांधी म्हणाल्या, "या निवडणुकीतही मी खांद्याला खांदा लावून लढणार आहे. आम्ही या निवडणुका तुमच्यासाठी लढवणार आहोत, कारण तुमचा विकास व्हावा. आता संधी चालून आली आहे. असा संदेश देशाला देण्याची की, आम्ही सेवेचे राजकारण करतो. ही तुमची निवडूक आहे, तुम्ही जिंकाल. मी 6 मे पर्यंत अमेठीत राहीन. अमेठीची निवडणूक जनतेच्या बळावर जिंकू."