ED चौकशीत अधिकाऱ्यांचा खास सवाल; राहुल गांधींनीही दिलं 'स्मार्ट' उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 04:57 PM2022-06-22T16:57:51+5:302022-06-22T16:58:33+5:30
राहुल गांधींची ५ दिवसांत तब्बल ४० तास चौकशी
National Herald Rahul Gandhi ED: नॅशनल हेराल्ड प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) राहुल गांधींची ५ दिवस चौकशी केली. या ५ दिवसांत राहुल गांधींची ईडीच्या अधिकाऱ्यांनी तब्बल ४० तास चौकशी केली. मात्र, राहुल गांधी यांनी चौकशीदरम्यान केलेल्या गोष्टींचा उल्लेख केला नाही. आज मात्र राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करत होते, त्यावेळी त्यांनी ईडीचे अधिकारी त्यांच्याशी काय बोलत होते याबद्दल सांगितले. त्यावेळी त्यांनी काही मजेशीर किस्से सांगितले.
ईडीचा संदर्भ देत कार्यकर्त्यांना संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले, एके दिवशी रात्री ११ वाजता एका ईडीच्या अधिकाऱ्याने मला विचारले, "तब्बल ११ तास झाले. राहुल जी, तुम्ही अजूनही जरासुद्धा थकलेले दिसत नाही. तुमच्या चेहऱ्यावर ताणतणावर दिसून येत नाही. याचे उत्तर देताना, त्या अधिकाऱ्यांशी थोडंसं खोटं बोलावं असं मला वाटलं. त्यामुळे त्यांना म्हटलं, "मी विपश्यना करतो, त्यामुळे चेहऱ्यावर ताणतणाव दिसून येत नाही. मी काँग्रेसमधील कार्यकर्ता आहे. मला काँग्रेसने खूप काही शिकवलं आहे. संयमी वागणं ही काँग्रेसचीच शिकवण आहे. त्यामुळे तुमची चौकशी सुरू राहिली तर मी आणखी १० तास देखील चौकशीसाठी बसू शकतो."
आपल्या भाषणादरम्यान राहुल गांधी म्हणाले, “सत्य हे आहे की ईडीच्या चौकशीदरम्यान मी त्या खोलीत एकटा बसलो नव्हतो, तर काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता आणि नेता माझ्यासोबत तेथेच असल्यासारखे मला वाटत होते. तुम्ही एका माणसाला प्रश्न विचारून त्याच्यावर दबाव आणू शकता, पण काँग्रेसच्या करोडो नेत्यांवर आणि कार्यकर्त्यांवर दबाव आणून त्यांना तुम्ही थकवू शकत नाही. त्या खोलीत काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नेतेच नव्हते, तर या सरकारविरोधात न घाबरता लढणारे सारे जण उपस्थित होते असे मला वाटत होते. त्यामुळे माझ्यावर अजिबातच दडपण नव्हते", असं राहुल गांधी म्हणाले.