विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर राहुल गांधींचा गुजरात दौरा; पीएम मोदींना देणार आव्हान...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2024 08:50 PM2024-07-04T20:50:29+5:302024-07-04T20:50:51+5:30
लोकसभेतील भाषणानंतर राहुल गांधींचा दौरा महत्वाचा मानला जातोय.
Rahul Gandhi Gujarat Visit : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी शनिवारी (06 जुलै) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बालेकिल्ला असलेल्या गुजरातचा दौरा करणार आहेत. अलीकडेच, संसदेच्या अधिवेशनादरम्यान राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना सभागृहात आव्हान दिले होते की, आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेस भाजपचा दारुण पराभव करेल. या आव्हानानंतर राहुल गांधींचा दौरा चर्चेचा विषय ठरत आहे.
राहुल गांधी कार्यकर्त्यांची भेट घेणार
राहुल गांधींचा हा गुजरात दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. याचे कारण म्हणजे, संसदेत हिंदू धर्मावर वक्तव्य केल्यानंतर गुजरात प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयावर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. या दौऱ्यात राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्त्यांची भेट घेऊन आगामी रणनीती ठरवण्याची शक्यता आहे. गुजरात काँग्रेसचे अध्यक्ष शक्तीसिंह गोहिल यांनी गुरुवारी (04 जुलै) सांगितले की, ते राहुल गांधींशी बोलले आणि त्यांना अहमदाबादला येऊन स्थानिक नेत्यांच्या भेटी घेण्याची विनंती केली. गोहिल यांनी दौऱ्याच्या तारखेची पुष्टी केली नसली तरी, पक्षाच्या नेत्यांनी सांगितले की, भगवान जगन्नाथ रथयात्रेच्या पूर्वसंध्येला राहुल गांधी शनिवारी अहमदाबादला पोहोचू शकतात.
राहुल गांधींच्या वक्तव्यानंतर काँग्रेस कार्यालयात तोडफोड
2 जुलै रोजी संसदेत राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली होती. भाजप आणि आरएसएसवर निशाणा साधत ते म्हणाले होते की, जे स्वत:ला हिंदू म्हणवतात, ते फक्त हिंसाचारावर बोलतात. भाजपने राहुल गांधींवर हिंदूंना हिंसक संबोधल्याचा आरोप केला. भाषणाच्या दुसऱ्या दिवशी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी अहमदाबादच्या पालडी येथील काँग्रेस भवनाची तोडफोड केली होती.