"राहुल गांधींना 'अभय मुद्रे'संदर्भात ज्ञान नाही; मी त्यांना..."! रामभद्राचार्य स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2024 04:52 PM2024-07-02T16:52:51+5:302024-07-02T16:53:57+5:30
राहुल गांधी यांनी संसदेत चुकीचे विधान केले आहे. हिंदू कधीही हिंसा करत नाही. भाजपने देखील कधीही हिंसा केली नाही, असे रामभद्राचार्य यांनी म्हटले आहे.
काँग्रेस खासदार तथा लोकसभेती विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी (1 जुलै 2024) हिंदूंसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून राजकारण पेटताना दिसत आहे. या वक्तव्यासंदर्भात त्यांनी माफी मागावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाने केली आहे. याशिवाय, भाजपने हा मुद्दा हिंदू विरुद्ध राहुल गांधी असा बनवला आहे. तर दुसरीकडे आपण आपल्या वक्तव्यावर कायम आहोत, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
यातच आता, जगतगुरू रामभद्राचार्य यांनीही राहुल गांधी यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी यांनी संसदेत चुकीचे विधान केले आहे. हिंदू कधीही हिंसा करत नाही. भाजपने देखील कधीही हिंसा केली नाही, असे रामभद्राचार्य यांनी म्हटले आहे.
"राहुल गांधींना अभय मुद्रेसंदर्भात ज्ञान नाही" -
रामभद्राचार्य म्हणाले, "राहुल गांधींना अभय मुद्रेसंदर्भात ज्ञान नाही. मी सांगतो अभय मुद्रा काय असते ते. कँग्रेसने शिखांच्या हत्या केल्या. काँग्रेसने कितीतरी हिंसाचार केला आहे. राहुल गांधी यांचे वडील राजीव गांधी चांगले व्यक्ती होते. ते माझेही चांगले मित्र होते. जर राहुल गांधींनी सभ्यता दाखवली, तर मी त्यांना बरेच काही समजावून सांगू शकतो."
'अयोध्योत झालेली चूक दुरुस्त करू' -
उत्तर प्रदेश आणि अयोध्येत भाजपचे जे नुकसान झाले, त्यावर बोलताना राममभद्राचार्य म्हणाले, भाजपचा उत्तर प्रदेशात पराभव झाला, कारण त्यांना विरोधकांच्या खोट्या प्रचाराला काउंटर करता आले नाही. विरोधक सातत्याने संविधान आणि आरक्षणासंदर्भात खोटा प्रचार करत होते. भाजपला याचा सामना करता आला नाही. एवढेच नाही, तर अयोध्येत झालेल्या पराभवासंदर्भात बोलायचे झाल्यास, अयोध्येत जी चूक झाली, ती दुरुस्त केली जाईल," असेही रामभद्राचार्य यांनी म्हटले आहे.