राहुल गांधी यांची शिक्षा रद्द होणार? आजची सुनावणी पूर्ण; 20 एप्रिल रोजी येणार निर्णय...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2023 06:13 PM2023-04-13T18:13:35+5:302023-04-13T19:06:03+5:30
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शिक्षेला स्थगिती देण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
नवी दिल्ली: 'मोदी' आडनावाबाबत केलेल्या टीकेप्रकरणी सुरतच्या सत्र न्यायालयानेकाँग्रेस नेते राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. या शिक्षेमुळे त्यांची खासदारकीदेखील रद्द झाली आहे. या शिक्षेविरोधात त्यांच्याकडून याचिका दाखल करण्यात आली असून, या याचिकेवरील सुनावणी आज पूर्ण झाली. या प्रकरणी न्यायालय आता 20 एप्रिल रोजी निकाल देणार आहे.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. दरम्यान, 23 मार्च रोजी सुरत सत्र न्यायालयाने राहुल यांना दोषी ठरवून दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. मानहानीच्या प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर राहुल गांधी 3 एप्रिल रोजी सुरत सत्र न्यायालयात हजर झाले. त्यांनी न्यायालयात या शिक्षेविरोधात याचिका दाखल केली होती.
निर्णय राहुलच्या बाजूने आला तर...
न्यायालयाने राहुल गांधींच्या बाजूने निकाल दिल्यास त्यांचे लोकसभेचे सदस्यत्व बहाल होऊ शकते. ही शिक्षा रद्द करण्याचे आवाहन राहुलच्या वतीने करण्यात आले आहे. न्यायालयाने शिक्षा रद्द केल्यास त्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. लक्षद्वीपमधील राष्ट्रवादीचे खासदार मोहम्मद फैजल यांना एका प्रकरणात 10 वर्षांची शिक्षा झाली होती. लोकसभा सचिवालयाने त्यांचे सदस्यत्वही रद्द करण्याची अधिसूचना जारी केली होती. पण, नंतर केरळ उच्च न्यायालयाने मोहम्मद फैजलची शिक्षा रद्द केली आणि लोकसभा सचिवालयाने त्यांना त्यांचे सदस्यत्व बहाल केले.
तसे झाले नाही तर...
राहुल गांधींना वरच्या कोर्टातून दिलासा मिळाला नाही तर त्यांची खासदारकी बहाल होणार नाही. एवढंच नाही तर राहुल गांधींना निवडणूक लढवण्यापासून रोखले जाऊ शकते. लोकप्रतिनिधी कायद्यांतर्गत दोन वर्षे किंवा त्याहून अधिक शिक्षा झालेल्या व्यक्तीला सहा वर्षे निवडणूक लढविण्यास बंदी आहे. हे निर्बंध शिक्षा पूर्ण झाल्यानंतर सुरू होतात. म्हणजेच राहुल गांधींना 8 वर्षे निवडणूक लढवता येणार नाही. याचा अर्थ दिलासा मिळाला नाही तर राहुल गांधी 2024 आणि 2029 च्या लोकसभा निवडणुका लढवू शकणार नाहीत.
मोदी आडनावाचा वाद काय?
2019 मध्ये कर्नाटक निवडणूक प्रचारादरम्यान राहुल गांधी यांनी मोदी आडनावावर भाष्य केले होते. 'नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी. हे आडनाव सामान्य का आहे? सगळ्या चोरांची आडनाव मोदी कसेकाय?' असे वक्तव्य त्यांनी केले होते. या प्रकरणी सुरत पश्चिम येथील भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावर मानहानीचा दावा दाखल केला होता. सुरत येथील सत्र न्यायालयाने या प्रकरणी राहुल गांधींना दोषी ठरवून दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यांना दोषी ठरवल्यानंतर दुसऱ्याच दिवशी लोकसभा सचिवालयाने त्यांचे सदस्यत्व रद्द केले. राहुल गांधी केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघातून खासदार होते.