राहुल गांधी अपरिपक्व आणि बेजबाबदार; त्या विधानावरून भाजपाचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 03:17 PM2020-06-18T15:17:39+5:302020-06-18T15:21:31+5:30
गलवानमध्ये बलिदान दिलेल्या वीर जवानांना जनता साश्रू नयनांनी अखेरचा निरोप देत आहे. मात्र दुसरीकडे राजधानी दिल्लीत राजकीय आरोप प्रत्यारोपांना उत आला आहे.
नवी दिल्ली - लडाखमधील गलवान घाटी.परिसरात चिनी सैनिकांचे अतिक्रमण रोखताना भारताच्या २० जवानांना वीरमरण आल्याने संपूर्ण देशात संतप्त वातावरण आहे. जनता वीर जवानांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप देत आहे. मात्र दुसरीकडे राजधानी दिल्लीत राजकीय आरोप प्रत्यारोपांना उत आला आहे. विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी गलवान घाटीत झालेल्या झटापटीवरून सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केल्यानंतर आता भाजपानेहीराहुल गांधींना टीकेचे लक्ष्य केले आहे.
लडाखमध्ये आपल्या जवानांना धोक्याच्या ठिकाणी निशस्त्र जाण्यास कुणी आणि का सांगितले होते. या जवानांच्या बलिदानाला कोण जबाबदार आहे असा सवाल राहुल गांधी यांनी विचारला होता. दरम्यान, त्याला आता भाजपाकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. राहुल गांधी या परिस्थितीतसुद्धा जबाबदारीने वागत नाही आहेत. त्यांना लष्करावर विश्वास नाही. देशाची दिशाभूल करण्याचे राजकारण राहुल गांधी यांनी सोडले पाहिजे, असा टोला भाजपाने लगावला आहे.
राहुल गांधी यांच्या विधानाला प्रत्युत्तर देताना भाजपा प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले की, राहुलजी तुम्ही अपरिपक्वपणे वर्तन करत आहात, तसेच देशाच्या पंतप्रधानांबाबत आक्षेपार्ह भाषेचा वापरही करत आहात. ही बाब खूप बेजबाबदारपणाची आणि दु:खद आहे. तसेच राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या काळात चीनसोबत झालेल्या करारांचा अभ्यास करावा, लॉकडाऊनमुळे मिळालेल्या वेळेचा फायदा घेत त्याबाबत वाचन केले पाहिजे, असा सल्ला संबित पात्रा यांंनी दिला. तसेच राहुल गांधी यांनी उद्यापर्यंत होणाऱ्या सर्वपक्षीय बैठकीची वाट पाहिली पाहिजे होती, असेही पात्रा यांनी सांगितले.