Rahul Gandhi : "मध्य प्रदेश ही भ्रष्टाचाराची राजधानी, आमचं सरकार येताच जातनिहाय जनगणना करू"
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2023 05:34 PM2023-11-13T17:34:36+5:302023-11-13T17:43:33+5:30
Rahul Gandhi : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही नीमच जिल्ह्यात जनतेला संबोधित केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही नीमच जिल्ह्यात जनतेला संबोधित केलं. भ्रष्टाचार आणि जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून राहुल गांधींनी मंचावरून महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे. मध्य प्रदेशात मागासवर्गीयांची लोकसंख्या अधिक असून त्यांना त्यानुसार हक्क मिळाले पाहिजेत, असंही राहुल यांनी म्हटलं आहे.
राहुल गांधी जावद येथील जाहीर सभेला संबोधित करताना म्हणाले, "मला माहीत आहे की ओबीसी प्रवर्गाची लोकसंख्या किमान 50 टक्के आहे. मी पंतप्रधान मोदींना जातनिहाय जनगणना करण्यास सांगताच, त्या दिवसानंतर पंतप्रधान मोदी त्यांच्या भाषणात भारतात जात नाही, इथे फक्त गरीब लोक आहेत असं म्हणतात. मध्य प्रदेशात आमचं सरकार सत्तेवर आल्यावर आम्ही जातनिहाय जनगणना करू."
नीमच जिल्ह्यातील जवाद विधानसभा मतदारसंघात राहुल यांनी काँग्रेस उमेदवार समंदर पटेल यांच्या समर्थनार्थ सभेला संबोधित केलं. "मध्य प्रदेश भ्रष्टाचाराची राजधानी बनली आहे. केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या मुलाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. राहुल यांनी मंचावरून लोकांना विचारलं की त्यांनी नरेंद्र सिंह तोमर यांच्या मुलाचा व्हिडीओ पाहिला आहे का? यानंतर ते म्हणाले की, केंद्रीय मंत्री आणि ओमप्रकाश सकलेचा यांच्यात स्पर्धा सुरू आहे."
"ही स्पर्धा गोरगरिबांचा आणि शेतकऱ्यांचा पैसा लुटण्याची आहे. चोरीचे पैसे कसे पचवले जात आहेत? मध्य प्रदेश आणि देशात जातनिहाय जनगणना आवश्यक आहे. मागासवर्गीय लोकसंख्या 50% आहे हे मी ठामपणे सांगू शकतो. जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींना संसदेत जातनिहाय जनगणनेबाबत विचारण्यात आले, तेव्हा त्यांनी मंचावरून भाषण करायला सुरुवात केली की देशात कोणती जात नाही. इथे एकच जात आहे आणि ती म्हणजे गरीबांची" असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
नीमच जिल्हा मध्य प्रदेशातील सर्वात लहान जिल्ह्यांपैकी एक आहे. सध्या विधानसभेच्या तीनही जागा भारतीय जनता पक्षाकडे आहेत. यावेळी भारतीय जनता पक्षाकडून विधानसभेची जागा हिसकावण्याचा काँग्रेसचा जोरदार प्रयत्न आहे. शिवराज सरकारचे उद्योगमंत्री ओमप्रकाश सकलेचा जावदमधून निवडणूक लढवत आहेत.