राहुल गांधी फडणवीसांच्या पावलावर पाऊल टाकण्याच्या तयारीत; मोदी सरकारचं टेन्शन वाढणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2021 02:31 PM2021-08-02T14:31:00+5:302021-08-02T14:33:10+5:30

नवी दिल्लीत हालचालींना वेग; राहुल गांधींनी उद्या बोलवली महत्त्वाची बैठक

rahul gandhi invites opposition leaders for breakfast might run parallel parliament session outside the house | राहुल गांधी फडणवीसांच्या पावलावर पाऊल टाकण्याच्या तयारीत; मोदी सरकारचं टेन्शन वाढणार?

राहुल गांधी फडणवीसांच्या पावलावर पाऊल टाकण्याच्या तयारीत; मोदी सरकारचं टेन्शन वाढणार?

Next

नवी दिल्ली: संसदेच्या पावसाळी अधिवेशनात जोरदार गोंधळ सुरू आहे. पेगॅसस हेरगिरी प्रकरण विरोधकांनी लावून धरलं आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये पेगॅससवरून विरोधी पक्षातील खासदारांची जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. त्यामुळे सभागृहाचं कामकाज वारंवार स्थगित करण्यात येत आहे. अधिवेशनाचे अनेक बहुमूल्य तास यामुळे वाया गेले आहेत. पेगॅसस आणि कृषी कायद्यांविरोधात आक्रमक झालेले विरोधी पक्ष आता वेगळाच मार्गाचा अवलंब करण्याची शक्यता आहे. त्यासाठी दिल्लीत जोरदार राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत.

संसदेत वारंवार होत असलेल्या गोंधळामुळे कामकाज होत नाही. त्यामुळे आता विरोधकांनी संसदेबाहेर समांतर संसद चालवण्याची तयारी सुरू केली आहे. राज्यात गेल्या महिन्यात विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन झालं. त्यात गोंधळ घातल्याप्रकरणी भाजपच्या १२ आमदारांना वर्षभरासाठी निलंबित करण्यात आलं. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या आवारातच समांतर अधिवेशन भरवलं. आता त्याच मार्गाचा वापर दिल्लीत विरोधक मोदी सरकारविरोधात करणार आहेत.

विरोधक संसदेच्याबाहेर समांतर संसद चालवण्याच्या तयारीत असल्याचं वृत्त आज तकनं सुत्रांच्या हवाल्यानं दिलं आहे. याबद्दलचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींसोबतच्या बैठकीत याबद्दल चर्चा करण्यात येईल. राहुल यांनी विरोधी पक्षातील नेत्यांना उद्या सकाळी साडे नऊ वाजता कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये नाश्त्यासाठी बोलावलं आहे. या बैठकीला दोन्ही सदनातील विरोधी पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत. विरोधकांना एकत्र आणण्याच्या दृष्टीनं राहुल यांचा हा पहिला प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे.

राहुल गांधींनी उद्याच्या बैठकीसाठी विरोधी पक्षातील सर्व नेत्यांना उद्याच्या बैठकीचं निमंत्रण दिलं आहे. तृणमूल काँग्रेसलादेखील निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. मात्र आपल्याला अद्याप तरी निमंत्रण मिळालं नसल्याचं तृणमूलमधील सुत्रांनी सांगितलं. राहुल गांधी विरोधकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहेत. याआधी दोनवेळा ते विरोधी पक्षाच्या बैठकीत सहभागी झाले आहेत. विजय चौक परिसरात झालेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधींचा सहभाग होता. आता त्यांनी कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये सर्वांना नाश्त्याचं आमंत्रण दिलं आहे.

Web Title: rahul gandhi invites opposition leaders for breakfast might run parallel parliament session outside the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.