राहुल गांधी बेजबाबदार, TMC खासदाराने माफी मागावी; जाट समाजाचे जगदीप धनखड यांना समर्थन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2023 02:48 PM2023-12-20T14:48:16+5:302023-12-20T14:49:33+5:30
तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची मिमिक्री केल्यामुळे राजकारण तापले आहे.
Loksabha MP Suspension Mimicry of Dhankhar ( Marathi News ) : राज्यसभा सभापती आणि देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड (jagdeep dhankhar) यांच्या 'मिमिक्री' प्रकरणावरुन राजकारण चांगलेच तापले आहे. भाजपपाठोपाठ जाट समाजही धनखर यांच्या समर्थनार्थ उतरला आहे. मिमिक्री करणारे टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जी(Kalyan Banerjee) यांनी माफी मागावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. बुधवारी जाट समाजाने जगदीप धनखड यांच्या समर्थनार्थ निदर्शने केली.
पालम खापचे प्रमुख चौधरी सुरेंद्र सोलंकी म्हणाले, एका शेतकरी समाजाचा अपमान झाल्यामुळे ही बैठक बोलावण्यात आली आहे. टीएमसी नेते कल्याण बॅनर्जी यांनी उपाध्यक्ष जगदीप धनखड आणि देशभरातील लाखो शेतकऱ्यांची माफी मागावी अन्यथा आम्ही आजच मोठी बैठक बोलवू आणि टीएमसीविरोधात आंदोलन करू. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचे या प्रकरणात नाव पुढे येणे, अत्यंत दुर्दैवी आहे.
उद्या भाजप देशभरात आंदोलन करणार आहे
दरम्यान, जगदीप धनखड यांच्या अपमानाविरोधात भाजप गुरुवारी देशभरात आंदोलन करणार आहे. उद्या दुपारी 12 ते 3 या वेळेत राहुल गांधी यांचा पुतळाही दहन करण्याची घोषणाही करण्यात आली आहे. या प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यावर भाष्य करण्यास नकार दिलाय.
'उपराष्ट्रपतींचा अपमान सहन करणार नाही'
संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी संसदेत बोलताना म्हणाले की, मी या घटनेचा तीव्र निषेध करतो. हे लोक घटनात्मक पदावर असलेल्या लोकांचा अपमान करतात. आधी पंतप्रधानांचा अपमान करायचे, कारण ते गरीब पार्श्वभूमीतून आलेले आहेत. तुमचाही अपमान केला, कारण तुम्ही शेतकरी पार्श्वभूमीचे आहात. भारत देश उपराष्ट्रपतींचा अपमान सहन करणार नाही.
'माझ्या जातीचा अपमान केला'
दरम्यान, जगदीप धनखड यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, मला माझी चिंता नाही, हे मी सहन करू शकतो. मात्र खुर्चीचा अनादर मी खपवून घेणार नाही. या खुर्चीची प्रतिष्ठा राखण्याची जबाबदारी माझी आहे. माझी जात, माझी पार्श्वभूमी, या खुर्चीचा अपमान झाला आहे.
'कल्याण बॅनर्जी काय म्हणाले?'
माफी मागण्याबाबत खासदार कल्याण बॅनर्जी म्हणाले, धनखडजींबद्दल माझ्या मनात खूप आदर आहे. ते आमचे माजी राज्यपाल राहिले आहेत. ते आपले उपराष्ट्रपती आहेत. मिमिक्री ही एक प्रकारची कला आहे, जी मी दाखवून दिली. अलीकडेच पंतप्रधानांनी लोकसभेतही मिमिक्री केली होती. त्यावेळी सर्वांनी त्याला गांभीर्याने घेतले नाही. माफी मागण्याचा प्रश्नच नाही.