नवी खेळी! राहुल गांधी जनमत तयार करणार; अदानी मुद्द्यावर देणार जोर, देशभरात आंदाेलने
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 08:57 AM2023-03-30T08:57:34+5:302023-03-30T08:58:15+5:30
आपल्या बाजूने जनमत तयार करण्यासाठी राहुल गांधी यांचे सध्या प्रयत्न सुरू आहेत.
- हरिश गुप्ता
नवी दिल्ली : मोदी आडनावाचे सगळे जण चोर आहेत, या वक्तव्याप्रकरणी सूरत न्यायालयाने सुनावलेल्या दोन वर्षे कारावासाच्या शिक्षेविरोधात काँग्रेस नेते राहुल गांधी अपील करण्यास विलंब लावत आहेत. या निकालानंतर त्यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द झाले. त्याबाबत आपल्या बाजूने जनमत तयार करण्यासाठी राहुल गांधी यांचे सध्या प्रयत्न सुरू आहेत.
मोदी आडनावाबाबत राहुल गांधी यांनी २०१९ साली कर्नाटकमध्ये एका सभेत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यामुळे त्यांना न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेविरोधात अपील करावे, असे त्यांचे वकील अभिषेक मनू संघवी यांचे मत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले की, लोकसभा सदस्यत्व रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात सर्व राज्यांतील काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शने करावीत, असे आदेश त्यांना पक्षश्रेष्ठींनी दिले आहेत. आपल्याबाबत लोकसभा सचिवालयाने घेतलेल्या निर्णयाविरोधात त्यांना जनमत, तसेच सहानुभूतीचे वातावरण निर्माण करायचे आहे, असे कळते.
याचिका तयार...
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना मानहानीच्या खटल्यात सुरत येथील ट्रायल कोर्टाने दिलेल्या शिक्षेला आव्हान देणारी याचिका तयार आहे.
सुरत येथील सत्र न्यायालयात ती लवकरच दाखल करण्यात येणार आहे. पक्षाचे सर्वोच्च कायदेशीर सल्लागार एक-दोन दिवसांत सुरत सत्र न्यायालयात दाखल होणाऱ्या पुनर्विलोकन याचिकेवर काम करत आहेत.
‘चौकीदार चोर है, पेक्षा अदानी मुद्दा प्रभावी’
‘चौकीदार चोर है’ या उल्लेखापेक्षा अदानी प्रकरणामुळे जनमत आपल्या बाजूने तयार होऊ शकते, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांना वाटते. २०१९च्या लोकसभा निवडणुकांत ‘चौकीदार चोर है’ या घोषणेचा फारसा परिणाम जाणवला नाही. मात्र, अदानी प्रकरणाबाबत सातत्याने बोलत राहिल्यास जनतेचा व अन्य विरोधी पक्षांचाही आपल्याला पाठिंबा मिळेल, अशी शक्यता राहुल गांधी यांना वाटते. तृणमूल काँग्रेस, आप, भारत राष्ट्र समिती या पक्षांनी अदानीच्या मुद्द्यावर काँग्रेसला पूरक भूमिका घेतली आहे.