राहुल गांधी माजी पंतप्रधानंचे पुत्र-नातू आणि पणतू, याशिवाय काहीच नाही; रविशंकर प्रसादांचा घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2023 04:41 PM2023-04-06T16:41:17+5:302023-04-06T16:41:45+5:30
भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी काँग्रेससह राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केला.
नवी दिल्ली: माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते रविशंकर प्रसाद अनेकदा काँग्रेसवर जहरी टीका करताना आढळतात. आता पुन्हा एकदा त्यांनी राहुल गांधींसहकाँग्रेसवर जोरदार हल्लाबोल चढवला. टीव्ही-9 हिंदी वृत्तवाहिनीशी बातचीतमध्ये रविशंकर प्रसाद यांनी राहुल गांधींवरील संसदीय समितीची कारवाई असो किंवा त्यांना दोन वर्षांची शिक्षा असो, सर्वच विषयांवर भाष्य केले आणि त्या विषयांवर भाजपची भूमिका स्पष्ट केली.
तुम्ही राहुल गांधींना घाबरता?
यावेळी प्रसाद म्हणाले, राहुल गांधी एका माजी पंतप्रधानाचे पुत्र, आणखी एका पंतप्रधानाचे नातू आणि पणतू आहे. त्यांनी थोडे वाचन-लेखन करावे आणि गृहपाठ करावा. राहुल गांधींना घाबरण्याचा प्रश्नच येत नाही. काँग्रेस कोणाला नेता बनवतो, हा त्यांचा विषय आहे. यावर मी एवढेच म्हणू शकतो की राहुल गांधी आमच्यासाठी गुड न्यूज आहेत.
राहुल सुरतला गेल्यामुळे तुम्ही का चिडला?
या प्रश्नावर रविशंकर म्हणतात, प्रश्न धोरणात्मक कारवाईचा आहे. तुम्हाला शिक्षा झाली, त्याविरुद्ध अपील करण्याचा अधिकार आहे. पण, तीन मुख्यमंत्र्यांसह सुरतला जायची गरज होती का? हा काही मेळावा नव्हता. तीन मुख्यमंत्री आपले काम सोडून जिल्हा न्यायाधीशांकडे जात असल्याचे देशात प्रथमच घडत आहे. तुमचा पक्ष एक आहे, हा संदेश राहुल गांधींना द्यायचा असेल, तर त्यासाठी वेगळे मार्ग आहेत. न्यायालयात दाखविण्याची काय गरज आहे. हे अत्यंत अलोकतांत्रिक आणि कायद्याच्या विरोधात होते.
राहुल गांधींवरील कारवाईवर...
यापूर्वी भाजप नेत्यांवर अशी कोणतीही कारवाई झाली नाही असे नाही. आतापर्यंत 32 जणांना अपात्र ठरवण्यात आले आहे. भाजपच्या 6 लोकप्रतिनिधींचाही समावेश आहे. लिली थॉमस प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला की, कोणत्याही लोकप्रतिनिधीला 2 वर्षांची आणि भ्रष्टाचाराशी संबंधित प्रकरणांमध्ये 1 महिन्याची शिक्षा होताच तुमचे सदस्यत्व रद्द केले जाईल. हे थांबवण्यासाठी मनमोहन सिंग यांच्या सरकारने अध्यादेश काढला होता. पण, राहुल गांधींनी तो अध्यादेश फाडून फेकून दिला, असे प्रसाद म्हणाले.
राहुल गांधी विदेशात जाऊन बदनामी करतात
राहुल परदेशात म्हणाले होते की, भारतात लोकशाही कमकुवत होत आहे, आणि अमेरिका आणि युरोपीय देश काहीच करत नाहीत. राहुल गांधींचा नुकताच ईशान्येत पराभव झाला. जनतेने त्यांना मत दिले नाही. जर राहुल गांधींना मते मिळाली नाहीत म्हणून, लंडनमध्ये जाऊन राग काढू नका, लोकशाहीला दोष देऊ नका, असेही ते यावेळी म्हणाले.