'राहुल गांधी देशातील नंबर-1 दहशतवादी', केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टू यांचे वादग्रस्त वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2024 06:44 PM2024-09-15T18:44:53+5:302024-09-15T18:45:48+5:30

राहुल गांधी यांनी शीख धर्माबाबत केलेल्या वक्तव्यामुळे रवनीत बिट्टू नाराज आहेत.

'Rahul Gandhi is the number-1 terrorist in the country', Union Minister Ravneet Singh Bittu's controversial statement | 'राहुल गांधी देशातील नंबर-1 दहशतवादी', केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टू यांचे वादग्रस्त वक्तव्य

'राहुल गांधी देशातील नंबर-1 दहशतवादी', केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टू यांचे वादग्रस्त वक्तव्य

नवी दिल्ली : भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टू यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. बिट्टू यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना देशातील नंबर वन दहशतवादी म्हटले आहे. 'राहुल गांधींनी शिखांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला. शीख कोणत्याही पक्षाशी संबंधित नाहीत. राहुल गांधी हे देशाचे नंबर वन दहशतवादी आहेत,' असे ते म्हणाले.

राहुल गांधी नंबर वन दहशतवादी
केंद्रीय मंत्री बिट्टू भागलपूरमध्ये मीडियाशी बोलताना म्हणाले की, 'आधी मुस्लिमांचा वापर करुन देशात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तसे झाले नाही. तर आता देशाचे रक्षण करणाऱ्या शिखांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला जातोय. देशातील वॉटेंड जी विधाने करायचा, तीच विधाने राहुल गांधी करत आहेत. बॉम्ब बनवणाऱ्या फुटीरतावाद्यांनीही राहुल गांधींच्या वक्तव्याचे कौतुक केले आहे. जे लोक नेहमी इतरांना ठार मारण्याचा प्रयत्न करतात, ते जेव्हा राहुल गांधींच्या समर्थनार्थ येतात, तेव्हा समजून घ्या की, राहुल गांधी हे देशाचे एक नंबरचे दहशतवादी आहेत आणि त्यांना पकडण्यासाठी सर्वात मोठे बक्षीस दिले पाहिजे,' अशी बोचरी टीका त्यांनी केली.

राहुल गांधींचे भारतावर प्रेम नाही 
'माझ्या मते राहुल गांधी भारतीय नाहीत. त्यांनी भारताबाहेर जास्त वेळ घालवला आहे. त्यांचे मित्रही परदेशातच राहतात, त्याचे कुटुंब तिकडेच आहे. माझ्या मते, यामुळेच त्यांचे आपल्या देशावर फारसे प्रेम नाही. म्हणूनच ते देशाबाहेर जाऊन देशाबद्दल चुकीची वक्तव्ये करतात. राजकारणात असूनही त्यांना देशातील मजुरांचे दुःख काय आहे, हे त्याला माहित नाही. तुमचे अर्धे आयुष्य निघून गेले, आता तुम्ही विरोधी पक्षनेते झालात आणि फोटो काढण्यासाठी इकडे तिकडे फिरता', अशी खिल्ली त्यांनी उडवली.

राहुल गांधींच्या कोणत्या वक्तव्यावर बिट्टू संतापले 
रवनीत सिंह बिट्टू यांनी अमेरिका दौऱ्यावर राहुल गांधींनी शीख धर्मियांबाबत दिलेल्या वक्तव्यामुळे नाराज झाले आहेत. राहुल गांधी यांनी व्हर्जिनियामध्ये भारतीय अमेरिकन समुदायातील लोकांशी संवाद साधला होता. यादरम्यान त्यांनी आरोप केला होता की, आरएसएस काही धर्म, भाषा आणि समुदायांना इतरांपेक्षा कमी दर्जाचे समजतो. भारतात हा लढा राजकारणासाठी नाही, तर याच गोष्टीसाठी लढला जातो. सर्वात आधी तुम्हाला लढा कशासाठी आहे, हे समजून घ्यावे लागेल. हा लढा भारतात शिखांना पगडी घालण्याचा किंवा कडा घालण्याचा अधिकार आहे की नाही, याबद्दल आहे. शीख म्हणून तो गुरुद्वारात जाऊ शकतो की नाही, याचा लढा आहे, असे राहुल गांधी म्हणाले होते.

Web Title: 'Rahul Gandhi is the number-1 terrorist in the country', Union Minister Ravneet Singh Bittu's controversial statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.