राहुल गांधींमध्ये राजकीय कौशल्य नाही, मला काँग्रेस सोडण्यास भाग पाडलं : गुलाम नबी आझाद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2022 01:32 PM2022-08-29T13:32:18+5:302022-08-29T13:32:26+5:30
आजच्या काळात काँग्रेसच्या वर्किंग कमिटीचा कोणताही अर्थ नाही, आझाद यांचा निशाणा.
काही दिवसांपूर्वीच गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसचा हात सोडला होता आणि त्यानंतर टीकाही केली होती. परंतु आता पुन्हा एकदा आझाद यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांच्यात राजकीय कौशल्य नाही आणि त्यांच्या राजकारणातील प्रवेशानंतरच काँग्रेसची ही स्थिती झाली आहे. आजच्या काळात काँग्रेसच्या वर्किंग कमिटीचा कोणताही अर्थ नसल्याचंही आझाद म्हणाले. “मी काँग्रेस सोडून गेलो नाही, तर मला काँग्रेस सोडण्यास भाग पाडलं,” असंही ते म्हणाले.
“कोण स्वतः आपलं घर सोडतो. माझ्या कुटुंबीयांनी मला काँग्रेस सोडण्यास भाग पाडले. जेव्हा घरच्यांना वाटतं की हा माणूस नको आहे. घरातच जर आपल्याला परकं समजलं जाऊ लागलं तर? पुढे-मागे करणाऱ्या किंवा ट्वीट करणाऱ्या लोकांनाच पक्षात पद मिळतं,” असं काँग्रेस सोडण्याच्या प्रश्नावर आझाद म्हणाले.
जे लोक माझा डीएनए मोदी वाला असल्याची चर्चा करतात त्यांनी आधी स्वत:ला पाहावं. पंतप्रधान मोदी काय म्हणाले होते, काँग्रेसमुक्त भारत. ज्या लोकांनी काँग्रेसमुक्त भारत करण्यासाठी त्यांची मदत केली, त्यांनी मोदींची भेट घेतल्याचंही ते म्हणाले. लोकसभेत भाषणादरम्यान त्यांची गळाभेट गेतली आणि म्हटलं की तुमच्यासाठी आमच्या मनात काही नाही. मग ते भेटले की आम्ही?, असं म्हणत आझाद यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला.
मोदींची स्तुती
आझाद यांनी चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती केली. “ज्या लोकांना राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणात काही दिसते ते योग्य नाही. जर कोणी इतकंच अशिक्षित असेल, तर त्यानं पंतप्रधानांचं भाषण ऐकावं. मोदींनी लग्न केलं नाही, त्यांची मुलं नाहीत.. मी त्यांना क्रूर समजत होतो, परंतु त्यांनी माणूसकी दाखवली,” असंही आझाद यांनी नमूद केलं.
सोनिया गांधींबाबतही वक्तव्य
सोनिया गांधी यांनी १९९८ ते २००४ दरम्यान, सर्वांना एकत्र घेऊन पुढे जाण्याचं काम केलं. त्या ज्येष्ठ नेत्यांकडून सल्ला घेत होत्या. त्या त्यांच्यावर अवलंबून होत्या आणि त्यांचे सल्लेही ऐकत होत्या. त्यांनी मला आठ राज्यांची जबाबदारी दिली होती. त्यापैकी सात राज्यांमध्ये मी विजय मिळवून दिला होता. त्या कधीही हस्तक्षेप करत नव्हत्या. परंतु २००४ नंतर राहुल गांधींचा प्रवेश झाला आणि ही पद्धत संपली. सोनिया गांधींचं राहुल गांधीवरील अवलंबत्व वाढलं. परंतु राहुल गांधींकडे कोणतंही राजकीय कौशल्य नाही. राहुल गांधींशी सर्वांनी समन्वय साधावा असं त्यांना वाटत असल्याचंही आझाद यांनी स्पष्ट केलं.