लालूप्रसाद यादव यांच्या शापामुळे राहुल गांधी यांची खासदारकी गेली- गिरिराज सिंह
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2023 09:02 AM2023-03-26T09:02:04+5:302023-03-26T09:03:49+5:30
पाटणा : ‘राजद नेते लालूप्रसाद यादव यांचा शाप लागल्यामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी गेली’, असे प्रतिपादन केंद्रीय ...
पाटणा : ‘राजद नेते लालूप्रसाद यादव यांचा शाप लागल्यामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी गेली’, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी केले आहे. ते म्हणाले की, ‘चारा घोटाळ्यात शिक्षा झाल्यानंतर लालू यांची खासदारकी जाणार होती. त्यांची खासदारकी वाचण्यासाठी अपिलाची तरतूद असलेला अध्यादेश राहुल गांधी यांनी फाडला हाेता. तेव्हा लालूप्रसाद यांनी राहुल गांधी यांना शाप दिला होता.
भाजप लोकांच्या बुद्धिमत्तेचा अपमान करत आहे - सिब्बल
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी आडनावावर टिप्पणी करून ओबीसींचा अपमान केला आहे, असा आरोप भाजप नेत्यांनी केला होता. त्यावर राज्यसभा सदस्य कपिल सिब्बल यांनी पलटवार केला आहे. भाजपच्या दोन नेत्यांवर टीका करताना सिब्बल म्हणाले की, असे निरर्थक आरोप करून भाजप लोकांच्या बुद्धिमत्तेचा अपमान
करत आहे.
‘माकप’चा दुहेरी अजेंडा : काँग्रेस
केरळमध्ये सत्तारुढ माकप आणि मुख्यमंत्री पिनराई विजयन हे एकीकडे राहुल गांधी यांचे समर्थन करतात, तर दुसरीकडे युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर लाठीमार करायला सांगतात, असा दुहेरी अजेंडा राबवत आहेत, असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते व्ही. डी. सतीशन यांनी केला.
राहुल माफी मागू शकले असते : हिमंता सरमा
ज्या वक्तव्याबद्दल न्यायालयाने राहुल गांधी यांना शिक्षा ठोठावली ते वक्तव्य ते मागे घेऊ शकले असते किंवा त्याबद्दल माफी मागू शकले असते, असे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिसवा सरमा म्हणाले. सरमा म्हणाले, कधी कधी जीभ घसरते. आम्हीही याचा अनुभव घेतलेला आहे. मात्र, आम्ही माफी मागणारे निवेदन प्रस्तुत करून हे अनावधानाने झाले होते, असे सांगतो. राहुलदेखील असे करू शकले असते आणि विषय संपला असता.
केंद्राने मोठे मन दाखवायला हवे होते : प्रशांत किशोर
राहुल गांधी यांना झालेली दोन वर्षांची शिक्षा ‘अति’ असल्याचे सांगून राजकीय व्यूहरचनाकार प्रशांत किशोर यांनी सत्ताधारी पक्षाला ‘मोठे मन’ दाखवण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, कायदेशीर प्रक्रियेचा आदर करता राहुल यांनी सुनावण्यात आलेली शिक्षा जास्त वाटते. निवडणुकीच्या काळात लोक सर्व प्रकारची वक्तव्ये करतात.