"लोकशाहीची हत्या करण्याच्या भाजपच्या कटात मसीह केवळ 'मोहरा', मागे मोदींचा चेहरा"; राहुल गांधींचा निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2024 07:37 PM2024-02-20T19:37:26+5:302024-02-20T19:38:24+5:30
सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी यांच्यासह पक्षाच्या अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
चंदीगड महापौर निवडणुकीतील अनियमिततेच्या प्रकरणावर मंगळवारी (20 फेब्रुवारी) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी, सीजेआय डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने महापौर निवडणूक रिटर्निंग ऑफिसर अनिल मसिह यांनी अवैध घोषित केलेली सर्वच्या सर्व 8 मते 'वैध' असल्याचे घोषित केले. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी यांच्यासह पक्षाच्या अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफार्म 'एक्स'वर पोस्ट कत लिहिले, ''लोकशाहीची हत्या करण्याच्या भाजपच्या कटात मसीह केवळ 'मोहरा' आहे, मागे मोदींचा 'चेहरा' आहे.''
लोकतंत्र की हत्या की भाजपाई साजिश में मसीह सिर्फ ‘मोहरा’ है, पीछे मोदी का ‘चेहरा’ है।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 20, 2024
यासंदर्भात बोलताना काँग्रेसाध्यक्ष खर्गे यांनीही सोशल मीडिया प्लॅटफार्म 'एक्स'वर पोस्ट शेअर करत म्हटले आहे, सर्वोच्च न्यायालयाने लोकशाही निरंकुश भाजपच्या दंशापासून वाचविले आहे. भाजप अशा हेराफरीच्या माध्यमाने निवडणूक जिंकत होता. एवढेच नाही, तर चंदीगड महापौर पदाच्या निवडणुकीत संस्थात्मक मोडतोड ही मोदी-शाह यांच्या लोकशाही पायदळी तुडवण्याच्या कुटील कारस्थानाचा हा एक छोटासा नमुना आहे, असेही खर्गे म्हणाले.
'संविधानावरील हल्ल्याचा सामूहिक सामना करायला हवा' -
खर्गे म्हणाले, सर्व भारतीयांना आवाहन केले आहे की, त्यांनी संविधानावर झालेल्या या हल्ल्याचा सामूहिकपणे सामना करायला हवा. आगामी लोकसभा निवडणूक 2024 चा उल्लेख करत, ते म्हणाले, पुढच्या निवडणुकीत आपली लोकशाही चौकात असेल, हे आपण कधीही विसरू नये.