Rahul Gandhi Manipur Visit: "इथे जे घडत आहे, ते देशात कुठेही पाहिले नाही", मणिपूरमध्ये राहुल गांधींनी घेतली हिंसाचार पीडितांची भेट!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2024 08:49 PM2024-07-08T20:49:43+5:302024-07-08T20:50:36+5:30
Rahul Gandhi Manipur visit : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मणिपूरला यायला हवे होते, असेही राहुल गांधी म्हणाले.
मणिपूर दौऱ्यावर असलेले लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. मणिपूरमध्ये जे घडत आहे, ते देशात कुठेही पाहिलेले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मणिपूरला यायला हवे होते, असेही राहुल गांधी म्हणाले. तसेच, नरेंद्र मोदींनी मणिपूरमध्ये येऊन येथील लोकांना धीर द्यावा, अशी विनंती सुद्धा राहुल गांधी यांनी केली.
राहुल गांधी म्हणाले, "याठिकाणी एक मोठी घटना घडली आहे. यावेळी मला परिस्थिती चांगली होईल अशी आशा होती, मात्र तशी परिस्थिती अजिबात नाही. दुर्दैवाने परिस्थिती चांगली झालेली नाही. द्वेष आणि हिंसाचारातून कोणताही मार्ग सापडणार नाही. प्रेम आणि बंधुता यातून मार्ग काढू शकतो."
"मला राजकारण करायचे नाही. पण येथील परिस्थिती पाहून मला वाईट वाटते. पंतप्रधानांनी आधी मणिपूरला यायला हवे होते. पंतप्रधानांनी येथे येऊन लोकांचे म्हणणे ऐकावे, अशी विनंती करतो. यामुळे मणिपूरच्या लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण होईल", असे राहुल गांधी म्हणाले.
ते पुढे म्हणाले, "मी पीडितांशी बोललो. शांतता ही काळाची गरज आहे. इथे जे घडत आहे, ते मी देशात कुठेही पाहिले नाही. मला मणिपूरच्या लोकांना सांगायचे आहे की, मी तुमच्या भावाप्रमाणे येथे आलो आहे. येथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी जे काही आवश्यक असेल ते करण्यास आम्ही तयार आहोत. मला या मुद्द्याचे राजकारण करायचे नाही. हिंसा हा कशावरचा उपाय नाही."
राहुल गांधींनी शिबिरांना दिली भेट
राहुल गांधी यांनी सोमवारी मणिपूरमधील जिरीबाम आणि चुराचंदपूर जिल्ह्यातील मदत शिबिरांना भेट दिली आणि तेथे राहणाऱ्या लोकांशी संवाद साधला. तसेच, त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. मणिपूरमध्ये काँग्रेसने लोकसभेच्या दोन जागा जिंकल्या आहेत. यानंतर राहुल गांधी पहिल्यांदाच मणिपूरला पोहोचले आहेत. दरम्यान, गेल्या वर्षी मे महिन्यात मणिपूरमधील मैतेई आणि कुकी समाजातील लोकांमध्ये जातीय हिंसाचार सुरू झाला होता. यामध्ये २०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.