भाजीविक्रेता रामेश्वरबरोबर राहुल गांधी यांनी केले भोजन; विविध विषयांवर रंगल्या गप्पा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2023 09:11 AM2023-08-16T09:11:19+5:302023-08-16T09:13:38+5:30
महागाईमुळे होणाऱ्या त्रासाबद्दल बोलताना रामेश्वर यांना रडू कोसळल्याचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर झळकला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रामेश्वर या भाजीविक्रेत्यासोबत सोमवारी भोजन केले. महागाईमुळे होणाऱ्या त्रासाबद्दल बोलताना रामेश्वर यांना रडू कोसळल्याचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर झळकला होता.
रामेश्वर यांच्यासोबतचे छायाचित्र राहुल गांधी यांनी एक्सवर (ट्विटर) झळकविले. त्यासोबत लिहिलेल्या मजकुरात त्यांनी म्हटले आहे की, रामेश्वर हे एक जिंदादिल व्यक्ती आहेत. त्यांच्यामध्ये कोट्यवधी भारतीयांच्या मनमिळाऊ स्वभावाची झलक दिसते. अतिशय कठीण परिस्थितीचाही जे हसत हसत सामना करतात तेच खरे ‘भारत भाग्यविधाता’ असतात.
राहुल गांधी यांनी एक्सवर झळकविलेले रामेश्वर यांच्यासोबतचे छायाचित्र काँग्रेसनेही शेअर केले आहे. लोकनायकाला भेटण्याची रामेश्वर यांची इच्छा पूर्ण झाली, असे काँग्रेसने म्हटले आहे. राहुल गांधी यांनी आपल्या घरी रामेश्वर यांना जेवायला बोलावले होते. त्यावेळी या दोघांमध्ये विविध विषयांवर गप्पा रंगल्या होत्या, असेही काँग्रेसने म्हटले आहे. राहुल गांधी व रामेश्वर यांचा जेवतानाचा फोटोही व्हायरल झाला आहे.
माझ्याकडे पैसे नाहीत, रामेश्वर यांची खंत
- काही दिवसांपूर्वी रामेश्वर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यांच्याकडे रिकामी हँडकार्ट होती. त्याबद्दल विचारले असता ते म्हणाले होते की, टोमॅटोचे भाव गगनाला भिडल्यामुळे मी ते खरेदी करू शकलो नाही.
- टोमॅटोऐवजी तुम्ही दुसरी भाजी विकत घेणार का, असे विचारता ते म्हणाले की, माझ्याकडे पैसे नाहीत. या वाक्यानंतर रामेश्वर यांना रडू कोसळले होते. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तो काँग्रेस नेते राहुल गांधी व अन्य काँग्रेस नेत्यांनीही शेअर केला होता. वाढत्या महागाईबद्दल केंद्र सरकारवर टीका करण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी या व्हिडीओचा उपयोग केला होता.