हातात हातोडा, डोक्यावर टोपी अन् अंगात जॅकेट...राहुल गांधींनी घेतली रेल्वे ट्रॅकमनची भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2024 08:08 PM2024-09-03T20:08:52+5:302024-09-03T20:09:24+5:30

राहुल गांधी यांनी रेल्वे ट्रॅकमनची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

Rahul Gandhi met railway trackman | हातात हातोडा, डोक्यावर टोपी अन् अंगात जॅकेट...राहुल गांधींनी घेतली रेल्वे ट्रॅकमनची भेट

हातात हातोडा, डोक्यावर टोपी अन् अंगात जॅकेट...राहुल गांधींनी घेतली रेल्वे ट्रॅकमनची भेट

Rahul Gandhi : काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) अनेकदा देशातील तळागळातल्या लोकांच्या भेटी घेतात आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. दरम्यान, आज त्यांनी रेल्वे ट्रॅकमनशी भेटून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. राहुल गांधी यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये राहुल गांधींच्या हातात हातोडा दिसत आणि डोक्यावर टोपी घातलेली दिसत आहे. यावेळी त्यांनी ट्रॅकमनचे जॅकेटही घातले होते.

राहुल गांधींनी हा व्हिडिओ X वर पोस्ट करताना लिहिले की, रेल्वेला गतिमान आणि सुरक्षित ठेवणाऱ्या ट्रॅकमन बंधूंसाठी प्रणालीमध्ये ना पदोन्नती आहे ना भावना. भारतीय रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये ट्रॅकमन हे सर्वात दुर्लक्षित आहेत. मला त्यांना भेटण्याची आणि त्यांच्या समस्या आणि आव्हाने समजून घेण्याची संधी मिळाली.

ट्रॅकमन 8-10 किमी चालतो 
राहुल गांधी पुढे लिहितात, ट्रॅकमन 35 किलो टूल्स घेऊन दररोज 8-10 किमी चालतो. त्याची नोकरी ट्रॅकवरच सुरू होते आणि तो ट्रॅकवरुनच निवृत्त होतो. इतर कर्मचारी ज्या विभागीय परीक्षेत उत्तीर्ण होतात त्यातही ट्रॅकमनला बसू दिले जात नाही. ट्रॅकमन बंधूंनी सांगितले की, कामादरम्यान अपघातात दरवर्षी सुमारे 550 ट्रॅकमन आपला जीव गमावतात, कारण त्यांच्या सुरक्षेसाठी पुरेशी व्यवस्था नसते.

ट्रॅकमनला सुरक्षा साधने मिळावीत
प्रतिकूल परिस्थितीत मूलभूत सुविधांशिवाय रात्रंदिवस मेहनत करणाऱ्या ट्रॅकमन बंधूंच्या या प्रमुख मागण्या कोणत्याही परिस्थितीत ऐकल्या पाहिजेत. 1. कामाच्या दरम्यान प्रत्येक ट्रॅकमनला सुरक्षा उपकरणे मिळावीत, जेणेकरून त्याला ट्रॅकवर ट्रेन येण्याची वेळेवर माहिती मिळू शकेल. 2. ट्रॅकमनला विभागीय परीक्षेद्वारे (LDCE) पदोन्नतीची संधी मिळावी. ट्रॅकमनच्या कठोर परिश्रमानेच करोडो देशवासीयांचा सुरक्षित रेल्वे प्रवास पूर्ण होतो, त्यांची सुरक्षा आणि प्रगती दोन्हीही आपल्याला सुनिश्चित करावी लागेल, असे राहुल गांधी आपल्या पोस्टमध्ये म्हणाले.

Web Title: Rahul Gandhi met railway trackman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.