बेनामी शेल कंपन्यांमध्ये 20 हजार कोटी रुपये कोणाचे? राहुल गांधींनी पुन्हा पंतप्रधानांना डिवचले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2023 01:21 PM2023-04-04T13:21:28+5:302023-04-04T13:22:09+5:30
'देशात झालेल्या हिंसाचारात केंद्र सरकार पूर्णपणे अपयशी ठरले.'
Rahul Gandhi : काँग्रेस नेते आणि माजी खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा अदानी प्रकरणावरुन भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीनंतर राहुल यांनी पत्रकारांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न विचारला. 'बेनामी शेल कंपन्यांमध्ये 20 हजार कोटी रुपये कोणाचे आहेत?' असे राहुल यांनी विचारले.
20,000 करोड़ अडानी की शेल कंपनियों में बेनामी पैसे किसके हैं - प्रधानमंत्री चुप, कोई जवाब नहीं!
— Rahul Gandhi (@RahulGandhi) April 4, 2023
2000 sq km ज़मीन चीन ने छीन ली, जगहों के नाम भी बदल रहे - प्रधानमंत्री चुप, कोई जवाब नहीं!
प्रधानमंत्री जी, आख़िर इतना डर क्यों? pic.twitter.com/lBUIWczOGs
काल काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांसह राहुल गांधी सूरत सत्र न्यायालयात हजर झाले. त्यावर भाजपने टीका केली होती. आता त्यावरही राहुल यांनी पलटवार केला. 'देशात हुकूमशाही आलीये, असे भाजपला वाटते का? आधी म्हणत होते अपील का करत नाही? गेलो तर म्हणाले, बहिणीसोबत का गेलास? यावरुन भाजपचे मन काळे आहे, असे दिसून येते. न्यायमंत्र्यांना बोलण्यापूर्वी लाज वाटली पाहिजे. त्यांचा आपल्या न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही,' अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
राहुल गांधी पुढे म्हणतात की, 'दिल्ली, बंगाल, हरियाणा, महाराष्ट्रात होत असलेल्या हिंसाचारात केंद्र सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. भाजप अस्वस्थ आहे. महागाईवर सामान्य माणूस संतापलाय, चीनच्या मुद्द्यावर आपले सरकार गप्प आहे. हे कमकुवत सरकार आहे आणि हे त्यांचे भ्याड कृत्य आहे.'
याशिवाय अरुणाचलच्या 11 ठिकाणांच्या चीनने केलेल्या नामांतरावर ते म्हणाले की, 'याची सुरुवात 2016 पासून झाली. आता आमच्या 11 गावांची, पर्वतांची, नद्यांची नावे बदलली गेली. आपले सरकार यावरही गप्प आहे. मोदी सरकार चीनसमोर का नमले?, असा सवालही त्यांनी यावेळी केली.