Rahul Gandhi: 'नरेंद्र मोदी काँग्रेसला घाबरतात, पंतप्रधान संसदेत खोटं बोलतात'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2022 09:18 AM2022-02-09T09:18:21+5:302022-02-09T09:22:01+5:30
राहुल गांधींनी मोदींनी पलटवार करताना, पंतप्रधान खोटं बोलत असल्याचं म्हटलं. तसेच, नरेंद्र मोदी काँग्रेसला घाबरतात. आपला नाकर्तेपणा लपविण्यासाठी सातत्याने नेहरुंवर टीका करत आहेत
नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेमध्ये काँग्रेसवर कडाडून हल्ला केला. काँग्रेस विसर्जित करा, असे महात्मा गांधींनी म्हटले होते. काँग्रेस नसती तर ही लोकशाही घराणेशाहीपासून मुक्त राहिली असती. आणीबाणीचा कलंक लागला नसता, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर घणाघाती प्रहार केला. मोदींच्या टीकेला आता काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी प्रत्युत्तर दिलंय.
राहुल गांधींनी मोदींनी पलटवार करताना, पंतप्रधान खोटं बोलत असल्याचं म्हटलं. तसेच, नरेंद्र मोदी काँग्रेसला घाबरतात. आपला नाकर्तेपणा लपविण्यासाठी सातत्याने नेहरुंवर टीका करत आहेत. काँग्रेसमुळेच आज देशाचे संविधान टिकून आहे. त्यामुळेच, कधीकाळी 2 खासदार असलेला भाजप पक्ष आज सत्ताधारी आहे, अशा शब्दात राहुल गांधींनी मोदींना प्रत्युत्तर दिलंय.
वे इतना जो मुस्कुरा रहे हैं,
— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 8, 2022
क्या डर है जिसको छुपा रहे हैं? pic.twitter.com/VjCxWQXLYQ
काँग्रेस हा खरं बोलणारा पक्ष आहे, भाजपचा धंदा पूर्णपणे मार्केटींगचा आहे. त्यांचे मित्र, हितसंबंध, त्यांनी सगळीकडे खोटं पसरवलंय. त्यामुळेच, त्यांच्या मनात भीती आहे. पंतप्रधानांचं संपूर्ण भाषण हे काँग्रेस आणि जवाहरलाल नेहरुंवरच होतं. मात्र, भाजपने काय केलं, याबाबत पंतप्रधान काहीही बोलले नाहीत. काहीतरी मनात भीती आहेच, असे म्हणत राहुल गांधींनी मोदींवर प्रहार केला. मी म्हटले होते की, देशात 2 हिंदुस्थान बनविण्यात येत आहेत. 1 कोट्यवधी लोकांचा आणि दुसरा काही मोजक्याच श्रीमंत वर्गाचा. दुसरी बाब म्हणजे देशातील महत्त्वाच्या संस्थांवर ताबा मिळविण्यात येत आहे, ज्यामुळे देशाचं नुकसान होत आहे. पंतप्रधानांच्या विदेशनितीमुळे चीन व पाकिस्तान एक होताना दिसत आहेत, जे देशासाठी धोकादायक आहे. मात्र, पंतप्रधानांनी या प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत, असेही राहुल गांधींनी म्हटले.
काय म्हणाले होते पी.एम. मोदी
मोदी म्हणाले, की काँग्रेस विसर्जित झाली असती तर लोकशाही घराणेशाहीपासून मुक्त राहिली असती. देशात जातीयवाद राहिला नसता. शिखांचे हत्याकांड झाले नसते, दहशतवादही राहिला नसता. काश्मिरी पंडितांना काश्मीर सोडावे लागले नसते.
जेव्हा हृदयनाथ मंगेशकरांना नोकरीवरून काढले होते... -
मोदी म्हणाले की, वीर सावरकर यांची देशभक्तीपर कविता हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध करून रेडिओवरून प्रस्तुत केली होती. त्यावरून त्यांना ऑल इंडिया रेडिओमधून नोकरीतून काढले हाेते, तर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका केल्यामुळे गीतकार मजरुह सुलतानपुरी यांना तुरुंगात टाकण्यात आले होते.
महागाई नियंत्रणात -
मोदींनी महागाईच्या मुद्द्यावर विरोधकांच्या टीकेला उत्तर दिले. ते म्हणाले, की जगातील अनेक देशांमध्ये विकासदर मंदावला असून महागाई ऐतिहासिक उच्चांकी पातळीवर आहे. त्याउलट भारतात महागाईचा दर मध्यम असून विकासदर जास्त आहे.
‘पवारांकडून काहीतरी शिका’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे कौतुक केले. संपूर्ण मानवजातीवर संकट आले त्यावेळी काँग्रेसने सर्वपक्षीय बैठकीवर बहिष्कार टाकला. मात्र, पवार त्यावेळी म्हणाले, की मी जास्तीत जास्त लोकांशी बोलेन. त्यावेळी शरद पवार, तृणमूल काँग्रेस व इतर पक्षांच्या नेत्यांनी बैठकीला हजेरी लावली होती. शरद पवारांकडून काहीतरी शिका.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान