Rahul Gandhi News: '45 दिवस पोलीस झोपले होते का..?' राहुल गांधींच्या चौकशीवरुन काँग्रस नेत्यांचा भाजपवर घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2023 03:05 PM2023-03-19T15:05:55+5:302023-03-19T15:10:32+5:30
Rahul Gandhi News: श्रीनगरमध्ये केलेल्या वक्तव्यासंदर्भात दिल्ली पोलीस रविवारी सकाळी राहुल गांधी यांच्या घरी पोहोचले.
नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान श्रीनगरमध्ये केलेल्या वक्तव्यासंदर्भात दिल्ली पोलीस रविवारी सकाळी राहुल गांधी यांच्या घरी पोहोचले. यावरुन काँग्रेस नेते अभिषेक मनू सिंघवी, अशोक गेहलोत आणि पवन खेडा यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी अभिषेक मनु सिंघवी म्हणाले की, अवघ्या तीन दिवसांत नोटीस देऊन पोलीस राहुल गांधींच्या घरी पोहोचले आणि तेही ४५ दिवसांनी. राहुल गांधी सरकारला अवघड प्रश्न विचारत असल्याने हे सर्व घडत आहे का? हा निव्वळ छळ आहे,' अशी टीका त्यांनी केली.
ते पुढे म्हणाले, '16 मार्च रोजी सकाळी राहुल गांधींना नोटीस देण्यात आली होती आणि त्यात दोन पानांचे प्रश्न होते, ज्यामध्ये राहुल गांधींना भारत जोडो यात्रेदरम्यान भेटलेल्या लाखो लोकांची माहिती देण्यास सांगितले. असे प्रश्न तुम्ही आतापर्यंत किती पक्षांना विचारला आहे? गेल्या 70 वर्षांत कोणत्याही राजकीय प्रचारात असे प्रश्न विचारले गेले असतील, असे मला वाटत नाही. आश्चर्याची बाब म्हणजे 45 दिवस पोलीस काहीच बोलले नाहीत आणि अचानक पोलीस खडबडून जागे झाले. इतक्या दिवस पोलीस झोपले होते का? हे सूडाचे राजकारण आहे,' असे ते म्हणाले.
LIVE: Congress party briefing by Shri @Jairam_Ramesh, Shri @ashokgehlot51 and shri @DrAMSinghvi at AICC HQ. https://t.co/wWFe0DMOOt
— Congress (@INCIndia) March 19, 2023
अशोक गेहलोत काय म्हणाले?
यावेळी अशोक गेहलोत म्हणाले, 'वरुन सिग्नल मिळाल्याशिवाय दिल्ली पोलिस हे करू शकत नाहीत. आजच्या घडामोडी विश्वासाच्या पलीकडे आहेत. हिटलरदेखील पूर्वी खूप लोकप्रिय होता, नंतर तिथे काय झाले ते सर्वांनी पाहिले. सध्या देशात एजन्सीचा नंगा नाच सुरू आहे. राहुल गांधी यापुढेही बोलत राहतील. संपूर्ण देश घाबरला आहे. हे लोक हिंदू-मुस्लिमाचे राजकारण करत आहेत. खोटी आश्वासने देऊन भाजप सत्तेत आला. दिल्ली पोलीस हे काम स्वतः करू शकतात यावर माझा विश्वास नाही,' असे ते म्हणाले.
जयराम रमेश यांनी भाजपवर निशाणा साधला
पत्रकार परिषदेत जयराम रमेश म्हणाले की, 'हे सर्व अदानी प्रकरणावरुन लक्ष विचलित करण्यासाठी सुरू आहे. जेव्हापासून 16 पक्ष एकाच वेळी जेपीसीची मागणी करत आहेत, तेव्हापासून राहुल गांधी निशाण्यावर आहेत. आधी त्यांच्या लंडनमधील विधानाचा विपर्यास केला गेला, आता काश्मीरमधल्या वक्तव्यावरुन हे सुरू आहे. जोपर्यंत हे सूडबुद्धीचे राजकारण सुरू राहील, तोपर्यंत मधला मार्ग निघणे शक्य नाही', असे ते म्हणाले.