'जात जनगणना थांबवण्याचा विचार करत असाल, तर...', राहुल गांधींचा PM मोदींवर घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2024 08:18 PM2024-08-25T20:18:14+5:302024-08-25T20:18:32+5:30
Rahul Gandhi on Caste Census : राहुल गांधी लोकसभा निवडणुकीपासून जात जनगणनेची मागणी करत आहेत.
Rahul Gandhi on Caste Census : काँग्रेस नेते राहुल गांधी लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून देशात जात जनगणनेची मागणी करत आहेत. त्यांच्यासोबतच इतर अनेक विरोधी पक्षांनीही ही मागणी केली आहे. विशेष म्हणजे, केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनीदेखील या मागणीला समर्थन दर्शवले आहे. त्यामुळे या मुद्द्यावरुन सध्या राजकारण तापले आहे. दरम्यान, आता आजही राहुल गांधी यांनी जात जनगणनेच्या मुद्द्यावरुन मोदी सरकारला धारेवर धरले आहे.
एका हिंदी मीडिया हाउसने जात जणगणनेबाबत लोकांची मते जाणून घेण्यासाठी एक सर्वेक्षण केले, ज्यात बहुतांश लोकांनी जात जणगणनेची मागणी केल्याचे समोर आले आहे. यावरुन राहुल गांधी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर म्हणाले की, 'मोदीजी, तुम्ही जात जनगणना थांबवण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही स्वप्न पाहत आहात. आता कोणतीही शक्ती जात जणगणना थांबवू शकत नाही. भारताचा आदेश आला आहे, लवकरच 90% भारतीय जात जनगणनेला पाठिंबा देतील आणि मागणी करतील. आताच आदेशाची अंमलबजावणी करा, नाहीतर पुढचे पंतप्रधान हे करताना दिसतील,' अशी बोचरी टीका त्यांनी आपल्या पोस्टमधून केली.
मिस इंडिया ते क्रिकेट टीम...राहुल गांधींनी उपस्थित केला प्रश्न ?
अलीकडेच जात जनगणनेची मागणी करताना राहुल गांधी म्हणाले की, 'मी माजी मिस इंडियाची यादी पाहिली, पण विजेत्यांमध्ये एकही दलित, आदिवासी किंवा ओबीसी आढळली नाही. काही लोक क्रिकेट किंवा बॉलिवूडबद्दल बोलतील. मोची किंवा प्लंबरला कोणीही दाखवणार नाही. मीडियातील टॉप अँकरही दलित, आदिवासी किंवा ओबीसी समाजातील नाही. संस्था, कॉर्पोरेट्स, बॉलिवूड, मिस इंडियामध्ये 90 टक्के लोकांपैकी किती लोक आहेत, हे आम्हाला जाणून घ्यायचे आहे. मी फक्त एवढेच सांगेल की, 90 टक्के लोकांचा यात सहभाग नाही आणि हे थांबले पाहिजे,' अशीही टीका त्यांनी केली.
'मागास समाजाची चेष्टा करू नका'
राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांची प्रतिक्रिया आली आहे. त्यांनी राहुल गांधींवर 'बालबुद्धी' म्हणत थेट निशाणा साधला. किरेन रिजिजू म्हणाले, 'राहुल गांधी देशात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. आता त्यांना (राहुल गांधी) मिस इंडिया स्पर्धा, बॉलिवूड आणि खेळांतही आरक्षण हवे आहे. हा केवळ 'बालबुद्धीचा' मुद्दा नसून त्याचा जयजयकार करणारे लोकही तेवढेच जबाबदार आहेत. मागास समाजाची चेष्टा करू नका,' अशी टीका त्यांनी केली.
Shri Rahul Gandhi Ji can't divide our country. PM @narendramodi Ji made it clear that Supreme Court won't be allowed to alter reservations in IAS, IPS, IFS, all top services recruitment. But he can't see 1st Tribal President, OBC PM, Record Numbers of SC/ST Cabinet Ministers!
— Kiren Rijiju (@KirenRijiju) August 25, 2024
मायावतींचा राहुल गांधींना सवाल
दरम्यान, राहुल गांधी यांच्या मागणीवर बसपा सुप्रीमो मायावती यांनी पलटवार केला आहे. 'काँग्रेस एवढी वर्षे सत्तेत होती, तेव्हा त्यांनी जातिनिहाय जनगणना का केली नाही? काँग्रेस हा दुटप्पी भूमिका असलेला पक्ष आहे. याच काँग्रेस पक्षाने बाबासाहेब आंबेडकर यांना सन्मान दिला नाही. बाबासाहेब हयात असताना आणि त्यांचे निधन झाल्यानंतरही त्यांना काँग्रेसने भारतरत्न सन्मान दिला नाही. काशीराम यांच्या निधनानंतर एक दिवसाचा दुखवटाही पाळला नाही,' अशी टीका त्यांनी केली.