राहुल गांधींच्या EVM फिक्सिंगच्या आरोपांविरोधात भाजपची निवडणूक आयोगात तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2024 04:59 PM2024-04-01T16:59:18+5:302024-04-01T16:59:35+5:30
राहुल गांधी यांनी पीएम मोदींवर लोकसभा निवडणुकीत मॅच फिक्सिंगसारखे आरोप केले होते.
Rahul Gandhi on EVM: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर INDIA आघाडीने रविवारी (31 मार्च) दिल्लीतील ऐतिहासिक रामलीला मैदानावर 'लोकशाही वाचवा' सभेचे आयोजन केले होते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या सभेतून भाजपवर मॅच फिक्सिंग आणि EVM हॅकिंगसारखे आरोप केले. आता राहुल गांधींच्या याच वक्तव्याविरोधात भाजपने निवडणूक आयोगात तक्रार दाखल केली आहे.
काय म्हणाले होते राहुल गांधी?
राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर लोकसभा निवडणुकीत मॅच फिक्सिंग केल्याचा आरोप केला होता. तसेच, भाजप त्यांच्या प्रयत्नांमध्ये यशस्वी झाला, तर देशाची घटना बदलली जाईल आणि लोकांचे अधिकार नष्ट होतील. ही मॅच फिक्सिंग थांबवण्यासाठी संपूर्ण ताकदीने मतदान करण्याचे आवाहनदेखील राहुल यांनी केले होते. मॅच फिक्सिंगशिवाय, ईव्हीएम (हॅकिंग) शिवाय, सोशल मीडिया आणि प्रेसवर दबाव आणल्याशिवाय ते 180 चा टप्पाही पार करू शकणार नाहीत, असा आरोपही त्यांनी केला होता.
भाजपचे प्रत्युत्तर
राहुल यांच्या आरोपावर पलटवार करताना भाजपचे प्रवक्ते शेहजाद पूनावाला म्हणावे की, पूर्वीच्या काँग्रेस सरकारने त्यांच्या प्रमुख कुटुंबाला फायदा मिळवून देण्यासाठी श्रीलंकेशी करार केला आणि आपले कच्चातीवू बेट त्यांना देऊन टाकले. फूट पाडणारे राजकारण काँग्रेसच्या 'डीएनए'मध्ये आहे. 1947 मध्ये धर्माच्या आधारावर देशाचे विभाजन करून जम्मू-काश्मीरचा काही भाग पाकिस्तानच्या ताब्यात देण्यास काँग्रेसने मागेपुढे पाहिले नाही, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
भ्रष्टाचारात बुडालेल्या लोकांची सभा- भाजप
दरम्यान, भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनीदेखील इंडिया आघाडीच्या लोकशाही वाचवा सेभवर जोरदार टीका केली होती. सभा घ्यायला बंदी नाही, पण जमवणारे कोण? जे भ्रष्टाचारात बुडाले आहेत ते...जे जनतेचा पैसा लुटून तुरुंगात गेले आहेत ते...केजरीवाल लालूंच्या पावलावर पाऊल टाकत आहेत. असे भ्रष्टाचारी लोक पीएम मोदींच्या प्रामाणिक सरकारविरोधात एकवटले आहेत. पण, या देशातील जनता त्यांचे ऐकणार नाही. 4 जूनला सर्व काही स्पष्ट होईल.