कंगना रणौतच्या वक्तव्याने नवा वाद; राहुल गांधींनी BJP च्या धोरणांवर उपस्थित केला प्रश्न, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 09:53 PM2024-08-26T21:53:19+5:302024-08-26T21:54:59+5:30
Rahul Gandhi on Kangana Ranaut : खासदार कंगना रणौतने शेतकरी आंदोलनाबाबत केलेल्या वक्तव्याने मोठा वाद झाला आहे.
Rahul Gandhi on Kangana Ranaut : अभिनेत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या खासदार कंगना रणौत आपल्या वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असतात. त्यांच्या वक्तव्यांमुळे अनेकदा वादही होतो. दरम्यान, त्यांनी शेतकरी आंदोलनाबाबत केलेल्या ताज्या वक्तव्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. यावरुन राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्यानंतर भाजपने कंगना स्पष्ट शब्दात झापले. दरम्यान, आता यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.
राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली, "शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात अपयशी ठरलेल्या मोदी सरकारची प्रचार यंत्रणा सातत्याने शेतकऱ्यांचा अपमान करण्यात व्यस्त आहे. 378 दिवसांच्या मॅरेथॉन लढ्यात 700 शेतकऱ्यांनी बलिदान दिले. या शेतकऱ्यांना बलात्कारी आणि परकीय शक्तींचे प्रतिनिधी म्हणून संबोधणे, हा भाजपच्या शेतकरी विरोधी धोरणाचा आणि हेतूचा आणखी एक पुरावा आहे."
किसानों से किए वादों को पूरा करने में नाकाम मोदी सरकार का दुष्प्रचार तंत्र लगातार किसानों का अपमान करने में जुटा हुआ है।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) August 26, 2024
378 दिन चले मैराथन संघर्ष के दौरान 700 साथियों का बलिदान देने वाले किसानों को भाजपा सांसद द्वारा बलात्कारी और विदेशी ताकतों का नुमाइंदा कहना भाजपा की किसान…
"हे लाजिरवाणे शेतकरी विरोधी शब्द म्हणजे पश्चिम उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाबसह संपूर्ण देशातील शेतकऱ्यांचा घोर अपमान आहे. जो कोणत्याही परिस्थितीत स्वीकारता येणार नाही. शेतकरी आंदोलन मागे घेताना स्थापन करण्यात आलेली सरकारी समिती अजूनही थंडबस्त्यात आहे. सरकारला एमएसपीबाबतची भूमिका आजतागायत स्पष्ट करता आलेली नाही. शहीद शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना कोणतीही मदत देण्यात आलेली नाही. आता त्यांचे चारित्र्यहनन सुरू आहे. मोदी सरकारने शेतकऱ्यांचा केलेला विश्वासघात लपून राहू शकत नाही. नरेंद्र मोदी आणि भाजपने कितीही षडयंत्र रचले तरी इंडिया आघाडी शेतकऱ्यांना MSP ची कायदेशीर हमी देईल," अशी टीका राहुल गांधी यांनी केली.
काय म्हणाल्या होती कंगना रणौत?
दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीत कंगना राणौत म्हणाल्या की, "आपल्या देशाचे सर्वोच्च नेतृत्व मजबूत नसते, तर या लोकांनी पंजाबला बांग्लादेश बनवले असते. शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली जे काही चालू होते, ते संपूर्ण देश पाहत होता. निषेधाच्या नावाखाली हिंसाचार कसा पसरवला गेला. आंदोलनादरम्यान अनेक माणसे मारली गेली, मृतदेहांना लटकवले गेले, बलात्कार झाले...सरकारने कृषी विधेयक मागे घेताच या साऱ्यांना धक्का बसला. कारण त्यांची प्लॅनिंग खुप मोठी होती. त्यांच्यावर सरकारने वेळीच नियंत्रण मिळवले, अन्यथा ते काहीही करू शकले असते.'
भाजपने कंगना रणौतला झापले
कंगना रणौतच्या वादग्रस्त वक्तव्यावर भाजपच्या केंद्रीय माध्यम विभागाने अधिकृत निवेदन जारी केले आहे. यात म्हटले आहे की, "भाजप खासदार कंगना रणौत यांनी शेतकरी आंदोलनाच्या संदर्भात दिलेले विधान हे पक्षाचे मत नाही. भारतीय जनता पक्ष कंगना राणौतच्या विधानावर असहमत आहे. कंगनाला पक्षाच्या वतीने धोरणावर बोलण्याची परवानगी नाही. त्यांना भविष्यात असे कोणतेही वक्तव्य न करण्याचे निर्देश दिले आहेत."