'...देशाला लुटतोय मोदींचा खरा परिवार', भाजपच्या अभियानावर राहुल गांधींची बोचरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2024 09:09 PM2024-03-04T21:09:49+5:302024-03-04T21:10:55+5:30
लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने 'मैं हूं मोदी का परिवार' अभियान सुरू केले आहे.
Rahul Gandhi on BJP: लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने 'मैं हूं मोदी का परिवार' अभियान सुरू केले आहे. या अंतर्गत भाजप (BJP) नेते त्यांच्या सोशल मीडिया प्रोफाइलवर नावापुढे 'मैं हूं मोदी का परिवार' असे लिहत आहेत. आता काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भाजपच्या ‘मी मोदींचा परिवार’ या मोहिमेवर जोरदार हल्लाबोल केला.
रविवार, 3 मार्च रोजी पाटण्यातील इंडिया आघाडीच्या सभेमध्ये राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख आणि इंडिया आघाडीतील प्रमुख नेते लालूप्रसाद यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वैयक्तिक हल्ले केले होते. त्यांनी मोदींचे कुटुंब नसण्यावरुन टीका केली होती. त्यांच्या या टीकेला उत्तर देण्यासाठी आज सकाळपासून भाजप नेत्यांनी ‘मैं हूं मोदी का परिवार’ अभियानाला सुरुवात केली. या अंतर्गत भाजप नेत्यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांच्या नावासमोर ‘मैं हूं मोदी का परिवार’ असे जोडले.
किसान कर्ज़दार, युवा बेरोज़गार, मज़दूर लाचार!
— Rahul Gandhi (@RahulGandhi) March 4, 2024
और देश लूट रहा है मोदी का ‘असली परिवार’। pic.twitter.com/3dX0Pfal80
राहुल गांधींची बोचरी टीका
आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यावरुन भाजपवर बोचरी टीका केली. राहुल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पंतप्रधान मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी यांचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत कॅप्शनमध्ये लिहिले, "शेतकरी कर्जबाजारी, तरुण बेरोजगार, मजुर लाचार आणि देशाला लुटतोय मोदीचा खरा परिवार."
लालूंवर मोदींचा निशाणा
लालूंच्या टीकेला आज स्वत: मोदींनी प्रत्युत्तर दिले. मोदी म्हणाले की, माझ्या कुटुंबावरून मला लक्ष्य केले गेले. मात्र मी संपूर्ण देशच माझे कुटुंब मानतो. आज देशातील कोट्यवधी माता-भगिनी-मुली हेच मोदीचे कुटुंब आहेत. देशातील प्रत्येक गरीब माझे कुटुंब आहे. घराणेशाही पक्षाचे चेहरे वेगवेगळे असले तरी त्यांचे चरित्र एकच आहे. भ्रष्टाचार, घराणेशाही आणि तुष्टीकरणामध्ये गुंतलेले इंडिया आघाडीचे नेते चिडचिड करत आहेत, अशी टीका मोदींनी केली होती.