जवानांना धोक्याच्या दिशेने निशस्त्र कुणी आणि का पाठवले, राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2020 13:45 IST2020-06-18T13:42:33+5:302020-06-18T13:45:09+5:30
गलवान खोरे भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये झालेल्या झटापटीत भारताच्या २० जवानांना वीरमरण आल्याने सध्या देशभरात संतापाचे वातावरण निर्माण झालेले आहे. दरम्यान, या घटनेवरून आला राजकारणही सुरू झाले आहे.

जवानांना धोक्याच्या दिशेने निशस्त्र कुणी आणि का पाठवले, राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल
नवी दिल्ली - लडाखमधील गलवान खोऱ्यात भारत आणि चीनमध्ये सध्या कमालीचा तणाव निर्माण झालेला आहे. येथे भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये झालेल्या झटापटीत भारताच्या २० जवानांना वीरमरण आल्याने सध्या देशभरात संतापाचे वातावरण निर्माण झालेले आहे. दरम्यान, या घटनेवरून आला राजकारणही सुरू झाले आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी जवानांच्या मृत्यूवरून केंद्र सरकारला खरमरीत शब्दात जाब विचारला आहे. देशाच्या वीर जवानांना जवानांना धोक्याच्या दिशेने निशस्त्र कुणी आणि का पाठवले, अशी विचारणा त्यांनी केली आहे.
ट्विटरवर व्हिडीओ शेअर करून राहुल गांधी यांनी या घटनेवरून जाब विचारला आहे, ‘’बंधु भगिनींनो चीनने भारताच्या निशस्र सैनिकांची हत्या करून एक मोठा अपराध केला आहे. माझा प्रश्न आहे की, या वीरांना निशस्त्र धोक्याच्या दिशेने कुणी आणि का पाठवले, याला कोण जबाबदार आहे? असा सवाल राहुल गांधी यांनी विचारला आहे.
कौन ज़िम्मेदार है? pic.twitter.com/UsRSWV6mKs
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 18, 2020
१५ आणि १६ जूनच्या रात्री गलवान खोऱ्यात सैनिकी स्तरावरील चर्चा सुरू असताना भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झटापत झाली होती. या झटापटीमध्ये भारताच्या २० जवानांना वीरमरण आले होते. तर चीनचे ४३ सैनिक ठार झाले होते. या घटनेनंतर भारत आणि चीनमधील तणाव कमालीचा वाढलेला आहे. तसेच लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषा आणि अन्य ठिकाणच्या सीमारेषेवर भारताने लष्कराची कुमक वाढवली आहे. तसेच सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय लष्कराने पूर्व लडाख येथील देमचोक आणि पेंगाँगमधील गावे खाली करण्यास सांगितले आहे.
याशिवाय, भारतीय लष्कराने लडाखमध्ये जवानांच्या संख्येत वाढ केली आहे. तसेच, सीमावर्ती भागातील मोबाईल कनेक्टिव्हिटी बंद केली असून लोकांसाठी श्रीनगर लेह- महामार्ग बंद करण्यात आला आहे.
आता कुरापती केल्यास चीनला योग्य प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्कराचे जवान सज्ज आहेत. सीमेवर चीनने आपल्या सैन्यात वाढ केल्यानंतर भारताने गलवान घाडी, दौलत बेग ओल्डी, चुशुल आणि देपसांगमध्ये अतिरिक्त जवान तैनात केल्याचे सुत्रांनी सांगितले.