राहुल गांधी काँग्रेसचे पुन्हा अध्यक्ष होण्यास तयार, कार्यकारिणीची बैठक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2020 06:04 AM2020-12-20T06:04:36+5:302020-12-20T06:05:00+5:30
Rahul Gandhi : राहुल यांच्या भूमिकेने अध्यक्षपदाबद्दल निर्माण झालेली अनिश्चितता संपेल. मात्र काँग्रेसमध्ये संसदीय मंडळाची स्थापना करावी तसेच कार्यकारिणीच्या निवडणुका घेण्यात याव्यात, या मागण्यांवर २३ असंतुष्ट नेते कायम आहेत.
- शीलेश शर्मा
नवी दिल्ली : काँग्रेसचे पुन्हा एकदा अध्यक्ष होण्यास राहुल गांधी तयार आहेत. असंतुष्ट नेत्यांशी चर्चा करून काही प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी विद्यमान पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी शनिवारी काँग्रेसची बैठक बोलावली होती. त्यात असंतुष्ट नेत्यांचे काही प्रमाणात मतपरिवर्तन करण्यात सोनिया गांधी यांना यश आले आहे.
राहुल यांनी बैठकीत सांगितले
की, पक्ष जी जबाबदारी सोपवेल
ती स्वीकारण्यास आपण तयार
आहोत. राहुल यांच्या भूमिकेने अध्यक्षपदाबद्दल निर्माण झालेली अनिश्चितता संपेल. मात्र काँग्रेसमध्ये संसदीय मंडळाची स्थापना करावी तसेच कार्यकारिणीच्या निवडणुका घेण्यात याव्यात, या मागण्यांवर २३ असंतुष्ट नेते कायम आहेत.
तळागाळातील कार्यकर्त्यांशी संवाद साधावा - प्रियांका गांधी
या बैठकीत काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी सांगितले की, पक्षाच्या तळागाळातील कार्यकर्त्यांचे मत प्राधान्याने जाणून घेतले पाहिजे. त्यांच्याशी काँग्रेसच्या संघटनात्मक बाबींवर चर्चा केली पाहिजे.
प्रदेशाध्यक्षांचे अधिकार वाढवा - पी. चिदंबरम
माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी सांगितले की, काँग्रेसमध्ये बुथ स्तरावरील कमिट्यांची स्थापना करून त्यांना मजबूत करावे. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या अधिकारांत वाढ करण्यात आली पाहिजे.
चिंतन शिबिरही भरविणार
पंचमढी, सिमला येथे पूर्वी काँग्रेस पक्षाची दोन ते तीन दिवसांची चिंतन शिबिरे झाली होती. त्याच धर्तीवर पक्षाचे लवकरच एक चिंतन शिबिर आयोजिण्यात यावे, अशी सूचनाही असंतुष्ट नेत्यांनी या बैठकीत केली. त्याला सोनिया गांधी यांनी होकार दिला आहे.
निवडणुकांचा विचार योग्य
बैठकीला अशोक गेहलोत, गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, बी.एस. हुड्डा, अंबिका सोनी, पी. चिदंबरम, शशी थरूर, राहुल गांधी, प्रियांका गांधी आदी उपस्थित होते. संघटनात्मक निवडणुका घेण्याचा विचार योग्य असल्याचे सोनिया गांधी यांनी या वेळी सांगितले.