Rahul Gandhi Remarks: राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे उद्धव ठाकरे नाराज; काँग्रेसच्या डिनर पार्टीवर शिवसेना खासदारांचा बहिष्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 03:51 PM2023-03-27T15:51:52+5:302023-03-27T15:53:00+5:30
राहुल गांधी यांनी वीर सावरकरांवर केलेल्या वक्तव्यामुळे ठाकरे गटाच्या खासदारांनी काँग्रेसच्या डिनर पार्टीवर बहिष्कार टाकला आहे.
Rahul Gandhi On Veer Savarkar Row: लंडनमध्ये केलेल्या वक्तव्यामुळे भाजप काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या माफीची मागणी करत आहे. यातच राहुल गांधी यांनी वीर सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे भाजप त्यांच्यावर टीका करत आहेत. महाराष्ट्रात काँग्रेसचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेनंही यावर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच ठाकरे गटाच्या सर्व खासदारांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या डिनर पार्टीवरही बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
मल्लिकार्जुन खर्गे यांनी सोमवारी (27 मार्च) सायंकाळी सर्व विरोधी पक्षांच्या खासदारांसाठी त्यांच्या घरी जेवणाचे आयोजन केले आहे. उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी वीर सावरकरांचा अपमान केल्याच्या मुद्द्यावरून आपल्या पक्षाचा एकही नेता डिनरला उपस्थित राहणार नसल्याची पुष्टी केली आहे. 'माझे नाव सावरकर नाही, गांधी आहे. गांधी कोणाचीही माफी मागत नाहीत,' असे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले होते.
सावरकरांचा अपमान सहन करणार नाही
राहुल गांधींच्या या वक्तव्यानंतर भाजपसह अनेक पक्षांनी त्यांना विरोध केला. उद्धव ठाकरे यांनीही काल मालेगावच्या सभेतून राहुल गांधींना सुनावलं. 'सावरकर आमचे दैवत आहेत, त्यांनी 14 वर्षे अनन्वीत अत्याचार सहन केले आहेत. त्यांचा अपमान आपण सहन करणार नाही,' असे उद्धव ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्रातील जनता प्रत्युत्तर देऊ शकते
दुसरीकडे संजय राऊत यांनीही राहुल गांधींचा समाचार घेतला. 'वीर सावरकर आमच्या आणि देशासाठी श्रद्धेचा विषय आहे. अंदमानात 14 वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा सोपी नाही. अशा टीकेला महाराष्ट्रातील जनता चोख प्रत्युत्तर देऊ शकते. आम्ही तुमच्या सोबत आहोत पण वीर सावरकर हे आमचे प्रेरणास्थान आहेत,' असे संजय राऊत म्हणाले.