Rahul Gandhi : "कोणते राहुल गांधी खरं बोलत आहेत, तेलंगणाचे की दिल्लीचे?"; स्मृती इराणींचा खोचक टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2024 02:23 PM2024-03-23T14:23:37+5:302024-03-23T14:33:15+5:30
Smriti Irani And Rahul Gandhi : स्मृती इराणी यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार निशाणा साधला आहे.
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार निशाणा साधला आहे. स्मृती इराणी म्हणाल्या की, राहुल गांधी खरं बोलत नाहीत. राहुल सध्या अरविंद केजरीवाल यांच्या कुटुंबासोबत असल्याचं दाखवत आहेत, तर दुसरीकडे तेलंगणामध्ये त्यांनीच दिल्लीचे मुख्यमंत्री भ्रष्ट असल्याचा दावा केला आहे.
दिल्लीतील भाजपाच्या पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी हल्लाबोल केला आहे. "राहुल गांधी एकाच विषयावर किती प्रकारची टिप्पणी करू शकतात याचा पुरावा मी देऊ शकते. राहुल गांधी यांनी 2 जुलै 2023 रोजी तेलंगणामध्ये केसीआर भ्रष्ट असल्याचं म्हटलं होतं. त्यावेळी त्यांनी दिल्लीतही दारू घोटाळा झाला असल्याचा दावा केला होता. कोणते राहुल गांधी खरं बोलत आहेत, तेलंगणाचे की दिल्लीचे?" असा सवाल इराणी यांनी केला आहे.
केंद्रीय मंत्र्यांनी अजय माकन यांच्यावरही टीका केली. त्या म्हणाल्या की, "आम आदमी पक्षाने गोव्यात काँग्रेसचा पराभव करण्यासाठी भ्रष्टाचाराचा पैसा वापरल्याचं अजय माकन यांनी जाहीरपणे सांगितलं होतं. माकन यांनी या काळात अरविंद केजरीवाल यांच्यावरही निशाणा साधला होता."
"घटनात्मक पदावर असताना प्रामाणिक असल्याचा दावा करणारी व्यक्ती सरकारी यंत्रणेचा कसा गैरवापर करते हे केजरीवाल यांनी सिद्ध केले आहे. या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे आणि तथ्य धक्कादायक आहेत" असंही स्मृती इराणी यांनी म्हटलं आहे. ईडीने अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे.