'भारत जोडो यात्रेत' राहुल गांधींच्या सुरक्षेत हलगर्जीपणा, काँग्रेसने गृहमंत्र्यांना लिहिले पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2022 01:23 PM2022-12-28T13:23:31+5:302022-12-28T13:25:09+5:30
गेल्या १००हून अधिक दिवसापासून काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरू आहे. आता ही यात्रा दिल्लीत दाखल झाली आहे. दरम्यान,काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सुरक्षेत हलगर्जीपणाचे झाल्याचे समोर आले आहे.
गेल्या १००हून अधिक दिवसापासून काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरू आहे. आता ही यात्रा दिल्लीत दाखल झाली आहे. दरम्यान,काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सुरक्षेत हलगर्जीपणाचे झाल्याचे समोर आले आहे. राहुल गांधींच्या सुरक्षेत हलगर्जीपणा झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेसने दिल्ली पोलिसांवर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. राहुल गांधी यांची सुरक्षा वाढवण्यासाठी गृहमंत्री अमित शाह यांना पत्रही लिहिले आहे.
भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांच्या सुरक्षेत त्रुटी संदर्भात काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी अमित शहा यांना पत्र लिहिले आहे. 24 डिसेंबर रोजी दिल्लीतील भारत जोडो यात्रेदरम्यान अनेक ठिकाणी राहुल गांधींच्या सुरक्षेबाबत निष्काळजीपणा करण्यात आला आहे.
गर्दी हाताळण्यात आणि राहुल गांधींना सुरक्षा देण्यात दिल्ली पोलीस पूर्णपणे अपयशी ठरले आहेत, असं या पत्रात म्हटले आहे. राहुल गांधींना झेड प्लस सुरक्षा आहे. भारत जोडो यात्रेत सहभागी होणाऱ्यांना त्रास देण्यासाठी आयबीचे लोक त्यांची चौकशी करत असल्याचा आरोपही काँग्रेसने केला आहे.
'आम्ही संवेदनशील भाग असलेल्या पंजाब आणि काश्मीरमध्ये जाणार आहोत. आता भाजपची सत्ता असलेल्या यूपी आणि हरियाणामध्ये भारत जोडो यात्रेच्या प्रवेशापूर्वी हे पत्र लिहिले आहे, असं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले. आज माजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि इतर नेते पक्षाचा 138 वा स्थापना दिवस साजरा करण्यासाठी AICC कार्यालयात उपस्थित आहेत.
पक्षाच्या 138 व्या स्थापना दिनानिमित्त काँग्रेस भारताच्या मूलभूत तत्त्वांवर सतत हल्ला होत आहे. संपूर्ण देशात द्वेषाची खंदक खणली जात आहे. महागाई, बेरोजगारीने जनता हैराण आहे पण सरकारला त्याची पर्वा नाही, असं काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले. काँग्रेसला सर्वसमावेशक बनवायचे असेल तर युवक, महिला, विचारवंत यांचा समावेश करावा लागेल आणि त्याची सुरुवात राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेने झाली आहे. त्याने आमच्या प्रतिस्पर्ध्यांना अस्वस्थ केले आहे, असंही अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले.