"...निकाल लागेपर्यंत राहुल गांधींना निलंबित करावे"; भाजपची विशेषाधिकार भंग, सभागृहाचा अवमान केल्याची नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 11:19 IST2024-12-20T11:19:05+5:302024-12-20T11:19:32+5:30
Rahul Gandhi vs BJP Lok sabha: हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी भाजपाची मोठी खेळी, राहुल गांधींंवर कारवाई होण्याची शक्यता.

"...निकाल लागेपर्यंत राहुल गांधींना निलंबित करावे"; भाजपची विशेषाधिकार भंग, सभागृहाचा अवमान केल्याची नोटीस
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचे आज सुप वाजणार आहे. काही दिवस सोडता हे अधिवेशनही प्रचंड गोंधळात वाया गेले आहे. संविधानावरील चर्चेत अमित शाह यांनी बाबासाहेब आंबेडकरांवर वक्तव्य केल्याने विरोधकांनी गेल्या दोन दिवसांपासून गोंधळास सुरुवात केली आहे. त्याला जशासतसे प्रत्यूत्तप म्हणून सत्ताधारीही बाह्या सरसावून उभे ठाकले आहेत. अशातच संसदेच्या पायऱ्यांवर झालेल्या धक्काबुक्कीत राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरून आज सत्ताधारी आर या पारची कारवाई करण्याच्या तयारीत आहेत. यामुळे आजचा शेवटचा दिवसही प्रचंड गोंधळाचा जाणार आहे.
भाजपाचे खासदार महात्मा गांधींच्या प्रतिमेजवळ जात काँग्रेस विरोधात आंदोलन करत आहेत. तर विरोधकांनी विजय चौकापासून ते संसदेपर्यंत रॅलीचे आयोजन केले आहे. भाजपानेराहुल गांधींवर धक्का मारून खासादारांना जखमी केल्याचे आरोप करण्यात आले आहेत. तर काँग्रेसकडूनही भाजप खासदारांवर धक्काबुक्की आणि खर्गेंना पायाला दुखापत केल्याचे आरोप करण्यात आले आहेत.
या सततच्या गोंधळामुळे लोकसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले आहे. तत्पूर्वी भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात विशेषाधिकार भंग आणि सभागृहाचा अवमान केल्याची नोटीस दिली आहे. गृहमंत्री अमित शहा यांच्या विधानाचा विपर्यास करून ते X वर चालवल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेषाधिकार भंगाची नोटीस लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना देण्यात आली आहे. हे प्रकरण विशेषाधिकार समितीकडे पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जोपर्यंत समिती याप्रकरणी निर्णय घेत नाही तोपर्यंत राहुल गांधी यांना लोकसभेतून निलंबित करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
शाह यांच्याविरोधात हक्कभंगाची नोटीस
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याविरोधात राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी हक्कभंगाची नोटीस पाठवली आहे. सभापती जगदीप धनखड यांच्याकडे खरगेंनी नोटीस सुपुर्द केली. शाह यांनी १७ डिसेंबर रोजी संसदेच्या वरिष्ठ सभागृहात ‘संविधानाचा ७५ वर्षांचा गौरवशाली प्रवास’ या विषयावरील चर्चेचे उत्तर देताना आंबेडकरांचा अवमान केला.