Rahul Gandhi: राहुल गांधींना पंतप्रधान आवास योजनेतून घर मिळावं; भाजपचा नगरपालिकेत अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2023 03:20 PM2023-03-02T15:20:08+5:302023-03-02T15:22:47+5:30
राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात भाषण करताना उपस्थित पदाधिकाऱ्यांसमोर भावूक किस्सा सांगितला होता
छत्तीसगडमधील नवा रायपूर येथे काँग्रेसच्या ५२ व्या राष्ट्रीय अधिवेशनात बोलताना काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी बालपणीच्या आठवणी सांगितल्या होत्या. तसेच, गेल्या ५२ वर्षांपासून आपल्याला आजही घर नाही, असेही त्यांनी म्हटलं. या अधिवेशन कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी यांनी भूतकाळातील, बालपणीच्या भावूक आठवणींचा किस्सा सांगितला. आता, भाजपने राहुल गांधींच्या या किस्स्यावरुन काँग्रेस आणि राहुल गांधींना लक्ष्य केलंय. राहुल गांधींचा मतदारसंघ असलेल्या वायनाड येथील भाजपने राहुल गांधींना पंतप्रधान आवास योजनेतून घर मिळावे, यासाठी अर्ज केला आहे.
राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात भाषण करताना उपस्थित पदाधिकाऱ्यांसमोर भावूक किस्सा सांगितला होता. मी ७ वर्षांचा असताना आम्हाला घर सोडावं लागलं, जे सरकारी होतं. आज, ५२ वर्षे झाली मला घर नाही, असे राहुल गांधींनी म्हटले होते. त्यानंतर, आता भाजपने राहुल गांधींना लक्ष्य केलं आहे. वायनाड भाजपने कलपेट्टा नगरपालिका सचिवांना एक निवेदन देऊन, राहुल गांधींसाठी घराची मागणी केली आहे. त्यानुसार, राहुल गांधींचं नाव पंतप्रधान आवास योजनेत घेण्याचं आणि त्यांना घर मंजूर करण्याचं आवाहन करण्यात आलंय.
वायनाडचे भाजप जिल्हाध्यक्ष केपी मधु यांनी बुधवारी राहुल गांधींना निशाण्यावर घेतलं. आम्ही काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना जमीन आणि एक घर मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहोत. हे घर जिल्ह्याच्या एरिया सेंटर भागात असावे असेही त्यांनी म्हटले. तसेच, हे घर त्यांच्यासाठी चांगली गोष्ट आहे, कारण, आपल्या सुट्ट्या घालवण्यासाठी ते या घरी वायनाडला येऊ शकतात, असेही मधु यांनी म्हटलं.
काय म्हणाले होते राहुल गांधी
मी वयाच्या ६ वर्षांचा होतो, तेव्हा आम्हाला राहता बंगला सोडून जायचं होतं. सन १९७७ ची गोष्ट आहे, निवडणूक आली होती, मला काहीही कळत नव्हतं. घरी वेगळंच वातावरण होतं. मी आईकडे गेलो आणि आईला विचारलं काय झालंय. तेव्हा आईने सांगितलं, आपण हे घर सोडतोय. तोपर्यत ते घर आमचंच आहे, असं मला वाटायचं. पण, आईने सांगितलं, राहुल हे आपलं घर नाही, हे सरकारी घर आहे. मग, मी प्रश्न केला आई कुठे जायचंय, तर आई म्हटली, माहिती नाही. मला काहीच समजेना. कारण, ते घर मी आमचंच समजत होतो. ५२ वर्षे झाली माझ्याकडे घर नाही, आजपर्यंत माझ्याकडे घर नाही, असा भावनिक किस्सा राहुल गांधींनी या अधिवेशनात सांगितला. मी १२ तुलघक रोडवर राहतो, पण माझ्यासाठी ते घर नाही.